‘राज ठाकरे हे सुद्धा ठाकरे ‘ब्रॅण्ड’चे घटक, संजय राऊतांकडून राज ठाकरेंना साद

Sanjay Raut-Raj Thackeray

मुंबई : मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे; मुंबईची सतत बदनामी हा त्या कारस्थानाचाच एक भाग आहे. मुंबईस पाकिस्तान म्हणणारी एक नटी, मुख्यमंत्र्यांना अरे-तुरे म्हणणारा एक वृत्तवाहिनीचा संपादक यांच्या मागे कोण आहेत? महाराष्ट्रातील मराठी माणसाने एक व्हावे असा हा कठीण काळ आलाच आहे. ‘ठाकरे’ (Thackeray)आणि ‘पवार’ (Pawar) हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे ब्रॅण्ड आहेत. मुंबईतून या ब्रॅण्डनाच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे,’ असा घणाघाती आरोप शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay raut)यांनी केला आहे. संजय राऊत यांनी या निमित्तानं राज ठाकरे (Raj Thackeray) यांनाही साद घातली आहे.

‘सामना’तील रोखठोक सदरात मुंबई विषयी सध्याच्या राजकीय घडामोडींवर राऊतांनी सडेतोड भाष्य केलं आहे. ‘महाराष्ट्राची राजधानी मुंबईस ग्रहण लावण्याचे प्रयत्न पुन्हा सुरू झाले आहेत. मुंबईची सतत बदनामी हा त्या कारस्थानाचाच एक भाग आहे. हे ग्रहण ‘उपरे’ लावत आहेत. पण त्यांना बळ देण्यासाठी परंपरेप्रमाणे आपल्यातलेच घरभेदी सरसावले आहेत. मधल्या काळात मुंबईस पाकिस्तान म्हटले गेले. मुंबईचा अवमान करणाऱ्य़ा एका नटीच्या बेकायदेशीर बांधकामांवर महापालिकेने कारवाई करताच महापालिकेचा उल्लेख ‘बाबर’ असा करण्यात आला. मुंबईला आधी पाकिस्तान, नंतर बाबर म्हणणाऱ्यांच्या मागे महाराष्ट्रात भाजप उभा राहतो हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसाने एक व्हावे असा हा कठीण काळ आलाच आहे,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.

‘राज ठाकरे हे सुद्धा महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या ठाकरे ‘ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ‘ठाकरे’ ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल,’ असं म्हणत राऊत यांनी राज ठाकरे यांनाही साद घातली आहे.

ही बातमी पण वाचा : ‘ठाकरे’ आणि ‘पवार’ हे दोनच महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा ब्रॅण्ड! – संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER