
पुणे : मुंबई, नवी मुंबईसह पुणे महापालिकेची निवडणूकही वर्षभरावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आतापासूनच सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सुद्धा पुण्यातील पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी सर्वच पदाधिकाऱ्यांनी ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील राजमहल या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. पुणे पालिका निवडणुकीला एक वर्ष शिल्लक असताना राज ठाकरे हे सक्रिय झाले आहेत. महाराष्ट्राचा दौरा करण्यापूर्वी राज ठाकरे हे अयोध्येला जाणार आहेत. त्यामुळे आनंदी झालेल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्यालाही सोबत येऊ द्यावं, अशी गळ घातली आहे. तसंच पक्षाने हिंदुत्ववादी भूमिका वळण घेतलं असलं तरी निवडणुकीत ‘एकला चलो रे’ अशीच भूमिका असावी, अशी बहुसंख्य मनसैनिकांची भावना असल्याचं पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना आवर्जून सांगितलं, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सध्या पुणे पालिकेत मनसेचे केवळ 2 नगरसेवक आहेत. 2012 साली 29 नगरसेवक होते. तेव्हा पक्ष 2 ऱ्या क्रमांकावर होता. आता राज ठाकरे एकट्याने लढणार का? भाजपासोबत युती करणार हे गुलदस्त्यात आहे. मात्र सध्या तरी कामाला लागा एवढाच संदेश राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे. मनसेचा वर्धापन दिन पुढच्या महिन्यात आहे. त्याच दिवशी राज ठाकरे पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकतील अशी चर्चा वर्तवली जात आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला