राज ठाकरेंचे सावरकरांना अभिवादन

Raj Thackeray Greets Veer Savarkar

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज ५४वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सावरकरांना श्रद्धांजली वाहिली. क्रांतिकारकांचे सेनापती, हिंदू राष्ट्रवादाची मांडणी करणारे तत्त्वज्ञ, विज्ञाननिष्ठ, ज्वलंत साहित्यिक, क्रियाशील समाजसुधारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची आज पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनम्र अभिवादन, असे ट्विट मनसेने केले आहे .

दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीवरून शिवसेनेची भूमिका अद्याप स्पष्ट नाही. सत्तेत भागीदारी असलेल्या काँग्रेसची नाराजी शिवसेनेला घ्यायची नाही. काँग्रेसने वीर सावरकरांबद्दल नेहमी अपमानास्पद शब्दांचा वापर केला आहे. शिवसेनेने स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी केली होती. ब्रिटिशांची माफी मागणाऱ्यांना भारतरत्न का द्यायचा, असा सवाल काँग्रेसकडून विचारला जातो. त्यामुळे सावरकर मुद्द्यावरून शिवसेना-काँग्रेस यांच्यात मतभेद आहेत.

दरम्यान २३ जानेवारी रोजी गोरेगाव येथील नेस्को मैदानातील सभागृहात पार पडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनात पक्षाच्या नव्या झेंड्याचे राज ठाकरेंच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमामध्ये मंचावर महापुरुषांच्या फोटोंमध्ये प्रखर हिंदुत्वाचे प्रतीक असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा पहिल्यांदाच ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. सावरकरांबरोबरच मनसेच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमांचाही समावेश होता.

सावरकरांचे स्वातंत्र्यासाठी असलेले योगदान कोणालाही नाकारता येणार नाही’ – अजित पवार