‘माझा वाघ गेला’, रमेश वांजळेंची आठवण काढत राज ठाकरे गहिवरले!

Ramesh Ranjale-Raj Thackeray

पुणे :- खडकवासल्यात आलो की, माझ्या रमेश वांजळे यांची आठवण आल्याशिवाय राहात नाही. ‘माझा वाघ गेला’, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या आमदाराच्या आठवणीने भावुक झाले. पुण्यातील निवडणूक प्रचार सभेत राज ठाकरे बोलत होते. या सभेत ते मोदी-शहा यांच्यावर तुटून पडले; मात्र रमेश वांजळेंची आठवण येताच ते भावुक झाले. राज यांचे एकेकाळचे सहकारी आणि ‘गोल्डमॅन’ म्हणून प्रसिद्ध झालेले मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या आठवणीने राज ठाकरे मंचावरच अक्षरश: गहिवरले.

“खडकवासल्यात आल्यानंतर माझ्या रमेश वांजळेची आठवण आल्याशिवाय राहात नाही. माझा वाघ गेला; तो आता असायला पाहिजे होता. ” अशा शब्दांत राज ठाकरे यांनी आपल्या गहिरवरल्या काळजाला वाट मोकळी करून दिली. त्यांनी रमेश वांजळेंच्या आठवणींना उजाळा दिल्यानंतर, उपस्थित लोकही काहीसे शांत झाले

ही बातमी पण वाचा : राज यांच्या भाषणाने जे मिळेल ते इतरांना – मनोहर जोशी

.रमेश वांजळे हे राज ठाकरे यांचे एकेकाळचे जवळचे सहकारी होते. ज्यावेळी एकाच फटक्यात मनसेचे १३ आमदार निवडून आले होते, त्यात एक रमेश वांजळे हेही होते. अंगावर सोन्याचे दागिने घालण्याच्या त्यांच्या सवयीमुळे वांजळेंना अवघा महाराष्ट्र ‘गोल्डमॅन’ म्हणून ओळखत असे. कट्टर राज ठाकरे समर्थक म्हणूनही वांजळेंची महाराष्ट्राला ओळख होती. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरे किती मतं खराब करतील?

अंगावर अडीच किलोंच्या सोन्याच्या दागिन्यांमुळे बांद्यापासून चांद्यापर्यंत हर एका माणसाला ‘रमेश वांजळे’ हे केवळ नावच नव्हे, तर नावासह नजरेसमोर करारी बाण्याचा ‘सोनेरी’ धिप्पाड माणूस उभा राहतो. बोटातल्या अंगठीत राज ठाकरेंची प्रतिमा नि गळ्यातल्या लॉकेटमध्येही राज ठाकरेच, अशा निष्ठावंत आमदाराने अल्पावधीतच ‘डॅशिंग आमदार’ म्हणून नाव कमावलं होतं. हिंदीतून शपथ घेणाऱ्या अबू आझमींचा माईक हिसकावून आपला आक्रमकपणा विधानसभेच्या पहिल्याच दिवशी दाखवणाऱ्या या सोनेरी आमदाराला अवघा महाराष्ट्र ओळखत होता.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरेंचा मतदानाचा अधिकार काढण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न; मनसेचा आरोप!