राज ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला; रूपाली पाटील यांना पदवीधर निवडणुकीची उमेदवारी

raj thackeray & Rupali Patil

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रूपाली पाटील यांना विधानसभा निवडणुकीवेळी दिलेल्या शब्दाची पूर्तता केली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेकडून पुणे पदवीधर मतदारसंघातून अ‌ॅड. रूपाली पाटील-ठोंबरे यांना उमेदवारी दिली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी राजकीय पक्षाकडून जाहीर करण्यात आलेली ही पहिलीच उमेदवारी आहे. खुद्द राज ठाकरे यांनी रूपाली पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्या  पक्षस्थापनेपासून (१४ वर्षांपासून) मनसेमध्ये कार्यरत आहेत.

त्यांच्या निष्ठेचं आणि कामाचं फळ त्यांना मिळालं आहे. यापूर्वी रूपाली पाटील यांनी पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून काम पाहिले आहे. सध्या त्या मनसेच्या पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. मनसेच्या आक्रमक नेत्या म्हणून त्यांना ओळखले जाते. महिला, युवक-युवतींच्या प्रश्नांवर त्यांचं विशेष काम आहे. स्थानिक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरील आंदोलनात त्यांचा सहभाग राहिला आहे. त्यामध्ये त्यांनी तुरुंगवासदेखील भोगला आहे.

त्या उच्चशिक्षित आहेत.  त्या व्हॉलीबॉल आणि शूटिंग व्हॉलीबॉल राष्ट्रीय खेळाडू राहिल्या आहेत. पदवीधर, युवक-युवतींचे रोजगाराचे तीव्र झालेले प्रश्न सोडवण्यावर भर देणार असल्याचे रूपाली पाटील यांनी उमेदवारी जाहीर झाल्यावर पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास रूपाली पाटील इच्छुक होत्या. मात्र या ठिकाणी मनसेने अजय शिंदे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे त्या  नाराज झाल्या होत्या. मात्र पक्षाचा आदेश अंतिम मानून त्यांनी विधानसभा निवडणुकीत अजय शिंदे यांचा जोरदार प्रचार केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER