राष्ट्रवादीच्या नेत्याला राज ठाकरेंची काळजी; पत्र लिहून केले आवाहन

मुंबई : मनसेचे (MNS) नेते राज ठाकरे (Raj Thackeray) मास्क बांधत नाहीत. ते कुठलेही कारण न देता स्पष्ट सांगतात – हो, मी मास्क वापरत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईट क्रास्टो (Clyte Krasto) यांनी याबाबत राज ठाकरे यांना खुले पत्र लिहून मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.

क्लाईट क्रास्टो यांनी राज ठाकरे यांना मास्क वापरण्याची विनंती केली आहे. त्यांनी राज ठाकरेंवर टीका न करता एक चाहता आणि प्रशंसक म्हणून काळजीपोटी विनंती करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपल्या राजकीय विचारधारा समान नाहीत; पण तुमचे भाषणकौशल्य आणि व्यंग्यचित्रांमुळे मी तुमच्याशी जोडला गेलो आहे, असे ते म्हणालेत.

राजसाहेब, तुम्ही लोकांसाठी प्रेरणा आहात, आपण जे बोलता त्या प्रत्येक शब्दाचे पालन आणि अनुकरण केले जाते. आपला मोठा चाहता वर्ग आहे. आपण त्यांचे गुरू, मित्र आणि मार्गदर्शक आहात. आपली भाषणे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात पाहिली-ऐकली जातात. त्यामुळे कोविड विरुद्धच्या लढाईत आपली भूमिका फार महत्त्वाची ठरते. मी तुम्हाला विनंती करतो, की तुम्ही मास्क घाला. केवळ तुमच्या अनुयायांसाठीच नव्हे, तर देशातील इतर नागरिकांसाठीही एक उदाहरण ठेवा, असे क्रास्टो यांनी पत्रात लिहिले आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियात व्हायरल होते आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER