राज ठाकरेंच्या एका फोनवर सरकारकडून मागणी मान्य; व्यावसायिकांनी केला सन्मान

Raj Thackeray

मुंबई : कोरोनाचा (Corona) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ‘ठाकरे’ सरकारने राज्यभरात कडक निर्बंध लावले आहेत. सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्य या दृष्टीने सॅनिटायझेशनचं महत्त्व वाढलं; परंतु ही सेवा अत्यावश्यक यादीत समाविष्ट नसल्यानं कर्मचाऱ्यांना गैरसोयींना समोरं जावं लागलं होतं. संचारबंदीच्या काळात पेस्ट कंट्रोल आणि औषध फवारणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपत्कालीन सेवामध्ये प्रतिबंध करण्यात आले होते.

‘आपत्कालीन सेवामध्ये पेस्ट कंट्रोल कर्मचाऱ्यांना सामावून घ्यावे’ या मागणीसंदर्भात इंडियन पेस्ट कंट्रोल असोसिएशच्या (Pest control staff) शिष्टमंडळाने मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. राज ठाकरेंनी या मागणीची दखल घेत सरकार दरबारी पाठपुरवठा केला. त्यामुळे सरकारने आता पेस्ट कंट्रोल आणि औषध फवारणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपत्कालीन सेवेच्या यादीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर इंडियन पेस्ट कंट्रोल असोसिएशनच्या शिष्टमंडळाने बुधवारी कृष्णकुंज निवास्थानी जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे आभार मानले आहेत. या शिष्टमंडळाने राज ठाकरेंना आभारपत्र आणि सन्मानचिन्ह दिलं आहे.

या आभारपत्रात पेस्ट कंट्रोल असोसिएशननं म्हटलं की, कोरोनाच्या भीतीने दिवसा-रात्री कोणत्याही वेळी सार्वजनिक आणि खासगी वास्तू, निवासी इमारती, बँका, रुग्णालय तसेच महाविद्यालयांना निर्जंतुक करण्याचं आव्हान होतं. तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे आमच्या कर्मचाऱ्यांच्या येण्याजाण्यावर बंधनं होती. अशा प्रतिकूल स्थितीतही आम्ही आमचं व्यावसायिक काम निष्ठेने करत राहिलो. कोरोनाकाळात कोणतीही रोगराई पसरून सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आणखी गंभीर होणार नाही याची खबरदारी घेतली. आमच्या सेवांचा समावेश अत्यावश्यक सेवेत व्हावा यासाठी आम्ही अनेकदा प्रयत्न केले. पण दुर्दैवाने आम्हाला प्रत्येक वेळी अपयश आलं.

गेल्या आठवड्यात इंडियन पेस्ट कंट्रोल असोसिएशनचे अध्यक्ष राजू परूळकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत आपण विषयाचं गांभीर्य ओळखून तत्काळ राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपेंशी बोललात. पेस्ट कंट्रोल आणि सॅनिटायझेशन सेवांचा समावेश अत्यावश्यक सेवांच्या यादीत होणं गरजेचे आहे हे तुम्ही त्यांना पटवून दिलं. इतकंच नव्हे तर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशीही आपण बोललात आणि आपल्या प्रयत्नामुळेच अखेर पेस्ट कंट्रोल आणि सॅनिटायझेशन सेवांचा समावेश अत्यावश्यक सेवांच्या यादीत महाराष्ट्र सरकारने अधिकृतपणे केला आहे. त्याबद्दल तुमचे आभारी आहोत, असं या पत्रात नमूद केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button