राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचे एकमत, दोघांनीही मुख्यमंत्र्यांकडे केली ही मागणी

raj thackeray & Devendra Fadnavis

मुंबई : राज्यातील जिम तत्काळ सुरु करण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. त्यासंबंधीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठवले आहे. त्याशिवाय, हळूहळू सर्वच क्षेत्रांचा विचार करुन अर्थकारणाला चालना देण्यासाठी त्या-त्या क्षेत्रांसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करीत ती क्षेत्रं खुली करायला हवी, अशी मागणीही देवेंद्र फडणवीसांनी या पत्रात केली आहे. मात्र फडणवीसांनी घेतलेली ही भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि फडणवीस यांनी चर्चेनंतर घेतल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

११ ऑगस्ट रोजी मुंबईतील जिम मालकांनी राज ठाकरे यांची भेट घेत आपली व्यथा मांडली होती. यावेळी राज ठाकरे म्हणाले होते की, जिम (Gym) व्यवसायाशी संबंधित असलेल्या अनेकांचा रोजगाराचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. यावरून तुम्ही जिम सुरू करा, किती दिवस लॉकडाऊनमध्ये (Lockdown) काढणार आहात?. जिमचालकांना केंद्राच्या नियमावलीनुसार नियम पाळून जिम सुरू करण्याचे आवाहन केले होते. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशीही माझं बोलणं झालं. त्यांचंही म्हणणं आहे की, जिम सुरू झाले पाहिजे. आता मी सांगतोय जिम सुरू करा, ज्याला यायचे आहे, तो जिमला येईल. बघू काय होते, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे जिममालक यांच्या भेटीनंतर म्हणाले होते. त्यानंतर आज फडणवीस यांनी जिम सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्याना पत्र लिहल्याने राज ठाकरे आणि फडणवीसांमध्ये एकमत असल्याचे उघड झाले आहे.

आज फडणवीस यांनी मुख्यमंत्र्याना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, “कोरोनाच्या संकटामुळे नागरिक त्रस्त असताना, आता त्यांना आणखी आर्थिक संकटात टाकता येणार नाही. जेव्हा एखादे संकट येते, तेव्हा केवळ आरोग्याच्या दृष्टीनेच त्याकडे पाहून चालणार नाही. तर, त्या संकटाचे सामाजिक, आर्थिक, मनोवैज्ञानिक परिणाम सुद्धा तपासले पाहिजे आणि आरोग्यासोबतच आर्थिक आणि सामाजिक स्वास्थ सुद्धा टिकून राहील, याचाही कटाक्षाने विचार केला पाहिजे”, असा सल्ला फडणवसांनी या पत्रात दिला.

“आज राज्यातील दारु दुकानं उघडली जात असताना जिम मात्र बंद ठेवली जातात. हे अतिशय दुर्दैवी आहे. राज्याचे अर्थकारण टिकले पाहिजे, हा आपला विचार असेल कदाचित. पण, राज्याचे आरोग्य सुद्धा टिकले पाहिजे, हा विचार आपण का करु शकत नाही? खरे तर कोरोना नियंत्रणाची संपूर्ण रणनीतीच चुकली आहे. ज्या काळात चाचण्यांवर आपण भर द्यायला हवा होता, त्या काळात चाचण्या केल्या नाही. नंतर चाचण्या वाढल्या, हे भासविण्याचा प्रयत्न झाला. संख्यावृद्धीसाठी अँटीजेन चाचण्यांवर भर देण्यात आला. परिणामी आज स्थिती अवघड झाली आहे. महाराष्ट्र हा देश असता तर जगात 6 व्या क्रमांकावर आपण आज आहोत”, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER