राज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि टोलाही लगावला, सत्ता त्यांना देता आणि ….

Raj Thackeray

मुंबई :  मार्च महिन्यात भारतात कोरोनाने हातपाय पसरण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे कोरोनाचा धोका लक्षात घेता देशात तात्काळ लॉकडाऊन घोषित करण्यात आला. कोरोनामुळे कधी न थांबणारी मुंबईदेखील एका दिवसात थांबली. मार्च पासून बंद असलेली मुंबईची जीवन वाहिनी मागील चार महिने पुर्णपणे बंदच होती. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांसाठी लोकल सेवा सुरू केली.

लोकल बरोबरच मग सर्व कामाची ठिकाणं बंद, उद्योगधंदे बंद यामुळे डब्बेवाल्यांचे ((Mumbai Dabbewala)) डब्बेही बंद होते. आता मुंबईत अनेक क्षेत्रात शिथिलता दिली आहे. मात्र, मुंबईकरांची जीवनवाहिनी लोकल सेवा अद्याप सुरू झालेली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल सुरू करण्यास विलंब लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.

यामुळे मुंबईची ओळख असलेल्या डब्बेवाल्यांची सेवा सध्या बंद आहे. त्याच संदर्भातले प्रश्न घेऊन या डब्बेवाल्यांनी गुरूवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. त्यावेळी शिवसेनेशी जवळीत असलेल्या डब्बेवाल्यांना राज ठाकरेंनी खास त्यांच्या स्टाईलमध्ये सुनावलं.

मुंबईतल्या चाकरमान्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये जेवणाचा टिफिन वेळे पोहोचविणाऱ्या या डब्बेवाल्यांची सेवा सध्या बंद आहे. या सेवेवरच शेकडो डब्बेवाले आपली उपजिविका चालवत असतात. सेवाच बंद असल्याने घर चालवायचं कसं असा त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला आहे. असे सगळे प्रश्न घेऊन त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांना व्यथा सांगितली.

लोकलमधून अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांबरोबरच डब्बेवाल्यांनाही प्रवासाची परवानगी मिळावी अशी त्यांची मुख्य मागणी होती. राज यांनी त्यांचे सगळे प्रश्न ऐकले आणि मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं. मात्र सत्तेवर आल्यानंतर सगळे प्रश्म मार्गी लावू असं उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिलं होतं असं सांगताच राज आपल्या खास शैलीत म्हणाले, सत्ता त्यांच्या हातात द्या, आणि प्रश्नांसाठी माझ्याकडे या.

डब्बेवाल्यांच्या संघटनांची शिवसेनेशी जवळीक आहे. निवडणुकीत या संघटनांची सेनेला मदत होते त्या सगळ्या पार्श्वभूमीवर राज यांनी टोला लगावल्याचं बोललं जातंय.

ही बातमी पण वाचा : मुंबई डबेवाल्यांचे शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER