राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येत हात जोडले अन् शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला !

मुंबई : शनिवारी मुंबईतील गेट-वेजवळच्या श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात शिवसेनाप्रमुख (Shiv Sena) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या पुतळ्याचे राजकीय दिग्गजांच्या हजेरीत मोठ्या थाटामाठात अनावरण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते अनावरण झाले आहे. या समारंभाला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते.

मात्र या सोहळ्यात सगळ्यांचे लक्ष लागून होते ते म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या होणाऱ्या मिलापाकडे. ही दोन्ही भावंडे जवळपास १४ महिन्यांनंतर एकाच व्यासपीठावर आलेले या सोहळ्यात पाहायला मिळाले. या संपूर्ण कार्यक्रमात हे दोन्ही बंधू पूर्णवेळ एकत्र होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर या दोघांनीही पुतळ्याचे छोटेछोटे बारकावे पाहिले. उद्धव ठाकरे यांनी राज यांना पुतळ्याबाबत काही माहिती दिल्याचंही यावेळी दिसून आलं. या कार्यक्रमावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र हात जोडत जनतेचे अभिवादन स्वीकारले. राज आणि उद्धव यांना अशा रीतीने एकत्र पाहिल्याने जमलेल्या तमाम शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला.

दरम्यान, बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, आजचा दिवस हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे. हा क्षण कायम लक्षात राहणारा आहे. काही काही क्षण असे असतात की ज्यावेळी आपण फार बोलू शकणार नाही. बाळासाहेब हे देशातील मोठे मार्गदर्शक होते. त्यांचे मार्गदर्शन कायम फायदेशीर ठरणारे आहे. बाळासाहेबांचे अनेक नेत्यांशी ऋणाणुबंध होते. आज या सोहळ्याला सर्व पक्षांचे नेते पक्षीय मतभेद विसरून उपस्थित होते. त्यांचे मी आभार मानतो, अशी भावुक प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER