सांगलीत पावसाचा हाहाकार

Sangli Heavy Rain

सांगली : गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने (Heavy Rain) शहरातील रस्ते जलमय झाले आहेत. तसेच बुधवारी दिवसभर आणि काल रात्री धो-धो पडणाऱ्या पावसाने शहरात पुरसदृश्‍य स्थिती दिसत आहे. गेल्या वर्षभरात केलेल्या रस्त्यांच्या कामांची पुरती वाट लागल्याचे चित्र आहे. प्रमुख रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांची कामे निकृष्ट असल्याचे समोर आले आहे.

संततधार पावसामुळे सखल भागातून येणारे पाणी कृष्णा नदीत मिसळत आहे. शेरीनाला पूर्ण भरल्याने साठलेले पाणी नदीत जात असल्यामुळे पाण्याचा रंगही बदलत आहे. शहरातील विविध भागात साठलेले दूषित पाणी शेरीनाल्यातून थेट नदीत जात आहे.

आता पावसाचा जोर वाढतच असून शेरीनाल्यातील दूषित पाणी नदीत मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. विशेष म्हणजे नेहमी फेसाळत असणारा हा नाला पावसाच्या पाण्याने मात्र ओव्हरफ्लो झाल्याचे चित्र आहे.

परतीच्या वादळी पावसाचा जिल्ह्यातील तडाखा कायम आहे. मागील २४ तासांवर अधिक काळ पावसाने अक्षरशः धुवून काढले. चांदोलीपासून उमदीच्या टोकापर्यंत पावसाने असे काही धुतले, की दुष्काळी भागालाही आता पाऊस नको म्हणायची वेळ आणली. आटपाडी तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील मुख्य रस्त्याचे सात पूल अतिपावसाच्या पाण्यापासून धोकादायक ठरणारे आहेत. वेळीच काही पुलांची उंची वाढविणे, तर काही उड्डाणपूल सार्वजनिक बांधकाम विभागाने करण्याची गरज आहे. तालुक्‍यात जोडणारे मुख्य दोन रस्ते बंद झाले आहे. भिवघाट, आटपाडी व खरसुंडी या रस्त्यांवरील मासाळ वस्ती, भिवघाट येथील पूल तालुक्‍यात जोडणारा आहे. हा पूल फार पूर्वीचा आणि कमी उंचीचा आहे. या वेळी हा पूलही पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे.

बहुतांश गावांचे ओढे दुथडी भरून वाहू लागलेत. पूरपरिस्थिती गंभीर बनली आहे. बहुतांश सर्वच ओढ्यांच्या पातळीत वाढ होऊ लागली. सकाळपासूनच आटपाडीचा मुख्य फरशी पुल, शेटफळे, माळेवाडी, शेटफळे- करगणी, करगणी-तळेवाडी, करगणी-चिंचघाट, अर्जुनवाडी ते गोमेवाडी, शेंडगेवाडी ते बनपुरी, खरसुंडी ते आटपाडीसह पूल पाण्याखाली गेले. अनेक पूल आणि रस्त्यांचे नुकसान झाले. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER