पावसाळी अधिवेशन पहिल्यांदाच अध्यक्षांच्या अनुपस्थितीत !

Nana Patole

मुंबई : कोरोनाच्या (Corona) साथीमुळे यंदाचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे होणार आहे. मात्र, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना कोरोना झाला असल्याने ते अधिवेशनाला उपस्थित राहणार नाहीत. अध्यक्षांशिवाय अधिवेशन होण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ आहे.

कोरोनामुळे अधिवेशनाला येणाऱ्या प्रत्येक आमदाराला मास्क, फेस शिल्ड, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज दिले जाणार आहेत. अधिवेशनाच्या दोन्ही दिवशी सर्वांनी हॅन्डग्लोज, मास्क लावून असणे बंधनकारक आहे. कोरोनामुळे एकत्र येण्याला बंधने आहेत. त्यामुळे सरकारच्यावतीने होणारा चहापानाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

कोविड आणि राज्यातील कायदा सुव्यवस्था लक्षात घेता हे अधिवेशन घेण्याचा अट्टहास केला जातोय, असा आरोप विरोधक करत आहेत. तसेच कोविडच्या संकटामध्ये अनेकांचा मृत्यू झाला तरीही शासनाचे दुर्लक्ष होते आहे. त्यामुळे विरोधी पक्ष कोरोना, कायदा सुव्यवस्था, शेती, शिक्षण या विषयावर विरोधी पक्ष सरकारला जाब विचारणार असल्याचे सांगितले जात आहे. अधिवेशन कालावधी केवळ दोन दिवसांचा असल्याने या अधिवेशनात प्रश्नोत्तरे आणि लक्षवेधी नाहीत.

पहिल्या दिवशी दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि इतर सदस्यांच्या निधनाबाबत शोक प्रस्ताव चर्चेला येणार आहेत. त्यानंतर सरकारच्यावतीने काही विधेयके मांडली जाणार आहेत. आर्थिक बिले पास करण्यासाठी अधिवेशन घेण्यात येत असल्याचे सत्ताधारी सांगत आहेत.

केवळ दोन दिवस चालणारे हे अधिवेशन अध्यक्षांच्या अनुपस्थितीत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. कालावधी कमी असला तरी सत्ताधाऱ्यांचा कल आर्थिक आणि कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याकडे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER