मुंबईत तुफान पाऊस : आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा; आयुक्त इक्बाल चहल यांची घोषणा

मुंबई :  मुंबईत मंगळवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत आतापर्यंत 150-200 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालयं, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) केले आहे. त्याबाबत मुंबईचे आयुक्त इक्बाल चहल (Iqbal Chahal) यांनी ही माहिती दिली.

काल रात्री दहाच्या सुमारास दक्षिण मुंबई कुलाबा ते माहीम येथे 80 ते 250 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सांताक्रुझमध्ये 180 मिमी पावसाची नोंद झाली आहे. चेंबूर ते वाशीमध्ये तितका पाऊस झालेला नाही. सर्वाधिक पाऊस कुलाबा, दक्षिण मुंबईत पाऊस झाला आहे. जे अत्यावश्यक सेवेतील स्टाफ आहेत, आम्ही सर्व रस्त्यावर आहोत”, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून रेल्वेसेवरही त्याचा परिणाम झाला आहे. चर्चगेट ते अंधेरी दरम्यान मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं या स्थानकांदरम्यान रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या अंधेरी ते विरार दरम्यान लोकल सेवा सुरू आहेत. तर दुसरीकडे मध्य रेल्वे मार्गावरही रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशीदरम्यान रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. सध्या केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेसेवा सुरू आहेत. आजही मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER