सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाने झोडपले, सर्वत्र पूरस्थिती

Rain lashes In Sindhudurg

सिंधुदुर्ग(प्रतिनिधी): अखंड मुसळधार पावसाने कुडाळ, सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्यांना गेले चार दिवस झोडपून काढले आहे. नदी-नाल्यांना महापूर आल्याने पुराचे पाणी नदीकाठची वस्ती, बागायती, भातशेतीत घुसून अतोनात नुकसान झाले. प्रमुख जिल्हा मार्गांसह ग्रामीण मार्गांवरील पूल, कॉजवे पाण्याखाली गेल्याने तीनही तालुक्यांतील जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले.

सरमळ-देऊळवाडी व मळगाव घाटीत रस्त्यांवर दरड कोसळल्याने या मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली. इन्सुली येथे जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर पाणी आल्याने हा मार्ग रविवार दुपारपर्यंत ठप्प झाला होता. कुडाळ शहरातील आंबेडकरनगर व गुलमोहर हॉटेल परिसर तर वेंगुर्ले शहरातील कॅम्प परिसरातील पुराचे पाणी घुसले होते. माणगांव खोर्‍याला कुडाळ व सावंतवाडी शहरांना जोडणारा ब्रिटिशकालीन आंबेरी पूल पाण्याखाली गेल्याने खोर्‍यातील २५ गावांचा संपर्क रविवार सायंकाळपर्यंत तुटला होता.

तालुक्यातील वेताळबांबर्डेे, पणदूर, पावशी या गावांमध्ये नदयांच्या पुराचे पाणी घुसल्याने काही घरांना पाण्याचा वेढा पडला. याबरोबरच बांदा-शिरोडा, न्हावेली-रेवटीवाडी, आरोंदा-सावंतवाडी हे प्रमुख मार्ग पाण्याखाली गेले होते. दांडेली पूल, कारिवडे, होडावडे यामार्गांवरही पाणी आल्याने ग्रामीण भागाचा संपर्क तुटला होता. अनसूर-धरमागावडे धरणाचे पाणी परिसरातील शेतात घुसल्याने भातशेती वाहून गेली. तर नारळ व सुपारी बागायतींचेही नुकसान झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER