मुंबईत पावसाचा जोर वाढला, हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी

Mumbai Rain

मुंबई : मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या दिशेला ७० किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. हे वारे ६ ऑगस्टपर्यंत सुरु राहतील, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच आज मुंबईसह (Mumbai) उपनगरात कोसळणाऱ्या पावसाने दुपारनंतर वेग धरला. तर अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील कोयना धरणाच्या जलाशयात ६ टीएमसी पाणी साचले आहे.

गेल्या काही तासांत मुंबईत अति मुसळधार पावसाची नोंद झाली तर उपनगरामध्ये केवळ मध्यम पावसाची नोंद झाली. हवामान विभागाने (आयएमडी) ६ ऑगस्टपर्यंत शहरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. परळ येथे मुसळधार पावसामुळे पाणी साचले. बेस्ट बसेस आता ४० पेक्षा अधिक मार्गांवर वळविण्यात आली असून प्रवाशांची गैरसोय होत आहे.

रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. यातच मस्जिद बंदर ते भायखळा दरम्यान २ लोकल ट्रेन्स अडकल्या होत्या. सीएसटीवरुन कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या या ट्रेन्समध्ये १५० प्रवाशी होते त्यांना रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी, पोलिसांनी रेस्क्यू केले. तर दुसऱ्या ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांचीही सुटका एनडीआरएफच्या माध्यमातून करण्यात आली. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने प्लॅटफॉर्मवर प्रवासी अडकून पडले होते, या प्रवाशांना एनडीआरएफच्या बोटीतून रेस्क्यू करण्यात आलं. पावसामुळे अडकलेल्या प्रवाशांची मुंबई महापालिकेकडून जवळच्या महापालिका शाळांमध्ये तात्पुरती निवासस्थानाची सोय करण्यात आली.

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरसह उत्तर कोकणात आज रात्रभर मुसळधार पाऊस पडण्याशी शक्यता, हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER