सांगलीत ५०० गावांना पावसाचा फटका

Sangli Rain Hit 500 Villagesw

सांगली : सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री व गुरुवारी सकाळपासून मुसळधार पाऊस झाला. धरण पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे. धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. परिणामी, कृष्णा, वारणा, येरळा, अग्रणी नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे ठिकठिकाणचे ओढे, नाले भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पुलावर पाणी आल्याने रस्ते बंद झाले आहेत. जिल्ह्यातील सुमारे 500 गावांना (500 Villages) पावसाचा तडाखा (Rain Hit) बसला आहे.

पुरामुळे मिरज तालुक्यातील मल्लेवाडी येथे महिलेचा बुडून मृत्यू झाला, तर बुडणार्‍या दोघांना वाचविण्यात नागरिकांना यश आले. तासगाव तालुक्यातील कौलगे येथे भिंत पडून दोन मुलांसह तिघे जखमी झाले.दिवसभर झालेल्या पावसामुळे शहरासह तालुक्‍यातील सर्वच ओढे, बंधारे,तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत होते. तर तब्बल पस्तीस ते चाळीस वर्षानंतर अग्रणी नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्याने महापूर सदृश्‍य परिस्थिती निर्माण झाली. नदीला महापूरसदृश्‍य परिस्थिती निर्माण झाल्याने नदीकाठच्या असलेल्या द्राक्षबागा पिकांना मोठे नुकसान झाले. लोणारवाडी येथील तब्बल पंचवीस वर्षानंतर यल्लमा मंदिरात पाणी शिरले होते. कवठेमहांकाळ तालुक्‍याच्या विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने सलगरे, हिंगणगाव, मोरगाव, देशिंग परिसरातील वाहतूक सायंकाळपर्यंत बंद होती. मोरगाव येथील अग्रणी नदीचा पुल खचल्याचे चित्र आहे.पावसामुळे शहरातील कमंडलू नदी (ओढापात्र)1995 नंतर पहिल्यांदा पुर आला. पुराचे पाणी शहरातील कवठेमहांकाळ – जत रस्त्यावरून वाहत होते.नदीकाठी असलेल्या मंदिरात पाणीच पाणी झाले.शहरातील मुख्य रस्त्यावर खड्डे पडले असून पावसाच्या पाण्यामुळे ते दिसून येत नाहीत.

पश्‍चिम विभागातील खरशिंग,देशिंग,हिंगणगाव,मोरगाव परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. आलेल्या पावसामुळे हिंगणगाव मोरगाव येथील अग्रणी नदीला महापूर सदृश्‍य परिस्थिती निर्माण झाली.नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्याने नदीकाठी असलेल्या द्राक्षबागा आणि अन्य पिकांना मोठा फटका बसला. नदीपात्राचे पाणी बाहेर पडल्याने शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेच्या चिंतेत आहे. काही भागात ऊस भुईसपाट झाला असून काही ठिकाणी माती वाहून जाण्याचे प्रकार समजत आहेत. मोरगाव येथील अग्रणी नदी पात्राबाहेर होत असल्याने नदीवरील असलेला पूल खचू लागला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER