चेन्न्ई सुपर किंग्जला हादऱ्यावर हादरे, रैना खेळणार नाही, आणखी एकाला कोरोना बाधा

Suresh Rain

इंडियन प्रिमियर लिगवर (IPL) आतापर्यंत दबदबा राखलेल्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांना एकापाठोपाठ धक्के बसत आहेत. आधीच त्यांच्या चमूतील एका खेळाडूसह 12 जण कोरोना पाॕझिटिव्ह आले. त्यानंतर आता संघातील हुकुमी खेळाडू सुरेश रैनाने (Suresh Raina) वैयक्तिक कारणास्तव यंदा माघार घेतली आहे. हे कमी की काय त्यांचा आणखी एक खेळाडू कोरोनाने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व घटनांमुळे चेन्नई सुपर किंग्जच्या चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर घेतल्या गेलेल्या पाच दिवसांच्या सराव शिबीराबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आपण यंदा आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट केल्यावर सुरेश रैना मायदेशी परतला आहे.

सीएसकेचे जे लोक पॉझिटिव्ह आले आहेत त्यात दोन मुख्य संघातील खेळाडू आहेत. इतर सरावाचे गोलंदाज आणि सपोर्ट स्टाफमधील आहेत. या संकटामुळे सीएसकेचा सराव बंद पडला आहे. संघ युएईमध्ये दाखल झाला असला तरी त्यांना क्वारंटाईन व्हावे लागले आहे.

सुरेश रैना हा सीएसकेच्या आतापर्यंतच्या 165 आयपीएल सामन्यांपैकी फक्त एकच सामना खेळलेला नाही. जो एकमेव सामना तो खेळला नाही तो पोटरीच्या दुखण्याने 2018 चा किंग्ज इलेव्हनविरुध्दचा सामना होता. त्याआधी सीएसकेसाठी तो सलग 158 सामने खेळलेला होता. याशिवाय आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा 5368 त्याच्या नावावर आहेत.

आयपीएलसाठी युएईकडे रवाना होण्याआधी सीएसकेने आपल्या संघातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी पाच दिवसांचे सराव शिबीर चेपाॕकवर घेतले होते. संघातील बहूतांश खेळाडू वयस्क असल्याने आणि गेल्या चार महिन्यांपासून त्यांचा काहीच सराव नसल्याने हे सराव शिबीर होते. अशा प्रकारे युएईला जाण्याआधी सराव शिबीर घेणारा सीएसके हा एकमेव संघ होता. मात्र आता या शिबिरानेच घोळ केल्याची चर्चा आहे. कारण ज्या चेपाॕक स्टैडियमवर हे शिबीर झाला त्याच्या लगतच्या भागात कोरोनाची साथ जोरात आहे. मात्र सराव शिबीर आणि खेळाडू व इतर जण पाॕझिटिव्ह येण्याचा खरोखरच काही संबंध आहे का हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER