पाऊस : मुंबईकरांसाठी आज सतर्कतेचा इशारा

Mumbai Rain

मुंबई :- दुपारनंतर अचानक ढग दाटून आले आहेत. मुंबई (Mumbai) आणि परिसरावर जास्त उंचीवर ढग जमल्याने विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढचे तीन-चार तास सावध राहा, असा इशारा मुंबई वेधशाळेचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर (K. S. Hosalikar) यांनी दिला आहे.

भारतीय हवामान विभागाने पुढचे दोन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात वादळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याचे हवामान बदलले आहे. यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास लांबला आहे. गेल्या काही तासांत  या कमी दाबाच्या पट्ट्याची  तीव्रता वाढल्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागाला हवामान खात्याने सतर्कचा इशारा दिला आहे.

गेल्या दोन-तीन तासांत पेण, नागोठणे, रोहा परिसरात जोरदार गडगडाट सुरू आहे. ठाण्यातही गडगडाट सुरू झाला आहे. सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरू झाला तर रस्त्यात पाणी साठू शकते. ऑफिस सुटण्याच्या आणि गर्दीच्या वेळातच वादळी पावसाची शक्यता असल्याने वेधशाळेने मुंबईकरांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

अंदमानात कमी दाबाचा पट्टा
अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ऑक्टोबरमध्ये अचानक पाऊस सुरू झाला. मुंबई, पुण्यासह राज्याच्या १६ जिल्ह्यांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी जोरदार वारा आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अंदमानजवळ निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा अधिकाधिक तीव्र होत असल्याने महाराष्ट्र, तेलंगण आणि आंध्रप्रदेश या तीन राज्यांना धोका असल्याची माहिती वेधशाळेने दिली. संपूर्ण राज्यभर आर्द्रतेत वाढ झाल्याने उकाडा वाढणार आणि दुपारनंतर जोरदार वादळी पाऊसही पडण्याची शक्यता आहे. पावसाचा अंदाज मान्सूनसारखा सर्वदूर वर्तवण्यात आलेला नाही. काही भागांत अतिमुसळधार पाऊस पडू शकतो तर थोड्याच अंतरावर पावसाचे प्रमाण कमी असू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER