पावसामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पूर परिस्थिती; शेती पाण्याखाली

मुंबई : परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात मोठा हाहाकार माजवला आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून, पुण्यात बुधवारी रात्री पावसाचं पाणी अनेक घरांमध्ये शिरलं. आज मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकणात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या मुसळधार पावसाचा फटका विठुरायाच्या पंढरीलाही बसला आहे.

उजनी आणि वीर धरणातून मध्यरात्री तीन लाख क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात आलं आहे. आज हे पाणी पंढरपुरात येईल. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं आहे. पंढरपुरात एनडीआरएफचं पथक तैनात करण्यात आलं आहे. पुराचा फटका बसू शकणाऱ्या एकूण सहा हजार नागरिकांचं स्थलांतर करण्यात येणार आहे. मध्यरात्रीच्या सुमारास एक हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह सोलापूर जिल्ह्यात जवळपास चार-पाच वर्षांनंतर परतीच्या पावसानं दमदार हजेरी लावायला सुरुवात केली. पण निसर्ग असा काही कोपला की खरिपाचं पीक डोळ्यासमोर पाण्यात वाहून गेलं. उस्मानाबाद, लातूर, बीड, औरंगाबाद या जिल्ह्यात शेतकऱ्यांनी काढून ठेवलेलं सोयाबीन वाहून गेलं. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळं उभा ऊस झोपला. तर कांदा, डाळिंब, द्राक्ष पिकांचंही अतोनात नुकसान झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER