‘जिंकत राहा’ हाच पावसाचा सांगावा

Keep on winning- let the rain tell

Shailendra Paranjapeपुण्यात गुरुवारी संध्याकाळी जोरदार पाऊस झाला. हवेत गारवा निर्माण झाला होता आणि हा पाऊस साधारणपणे आठवडाभर राहील, असं हवामान खात्याचं म्हणणं आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तीन दिवस पाऊस राहील, असंही हवामान खात्यानं सांगितलं आहे. गेले महिनाभराहून जास्ती दिवस आपण सारेच कोरोना रोगावर बोलत, लिहीत, वाचत असताना अचानक पावसानं हजेरी लावलीय आणि ही गोष्ट कोरोना भयग्रस्ततेत भर टाकणारी आहे, म्हणूनच हा लेखनप्रपंच.

तिसरा लॉकडाऊन १७ मे रोजी संपतोय आणि पंतप्रधानांनी जाहीरही केलंय की चौथा लॉकडाऊन वेगळ्या प्रकारचा असेल त्यासाठी विविध राज्यांकडून प्रस्ताव मागवण्यातही आलेत. त्यामुळं चौथा लॉकडाऊन त्यामध्ये अपेक्षित असलेलं प्रभावी विकेंद्रित वा स्थानिक पातळीवरचं नियोजन हे गृहीत धरलं तर कालच्या पुण्यातल्या पावसातून पुणेकर आणि परिसरातल्या तसंच मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातल्या नागरिकांनी तर खूपच काळजी घ्यायची गरज आहे.

पावसाचा आणि कोरोनाचा काय संबंध, असा प्रश्न मनात येऊ शकतो; पण विषाणुविज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांच्याच मते पाऊस होणं, तो मुसळधार होणं, त्यातून तापमान कमी होणं आणि हवा, ढगाळ राहणं हे सारंच कोरोनाच नव्हे तर सर्वच विषाणूंसाठी पोषक वातावरण आहे. म्हणजेच काल झालेला पाऊस हा कोरोना विषाणूचा संसर्ग वाढवू शकतो आणि म्हणूनच सध्यापेक्षाही जास्ती काळजी घेण्याची  गरज आहे. विषाणुविज्ञान क्षेत्रातले तज्ज्ञ हेही सांगतात की, कोरोना विषाणू म्यूटेट होतो म्हणजे तो स्वतःमध्ये  बदल करतो आणि परिस्थितीनुरूप तो आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतो.

पावसामुळे झालेल्या तापमान बदलांमुळे तो सक्रिय तर होतोच; पण यापूर्वीच्या स्वाईन फ्लूच्या विषाणूनं हेही दाखवून दिलंय की तो म्यूटेट होऊन विशिष्ट ऋतूपुरता मर्यादित न राहता म्हणजे विशिष्ट ऋतूत त्याची साथ येते असं न होता स्वाईन फ्लू वर्षभर केव्हाही होऊ शकतो, तसंच कदाचित कोरोनाचं होईल. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिव्ह विथ कोरोना म्हणजे कोरोना आहे, हे वास्तव आहे आणि आपल्याला कोरोना असल्याच्या काळात राहायचं आहे, आपलं अस्तित्व टिकवायचं आहे. त्यामुळं कोरोना विषाणू म्यूटेट होत असेल, स्वतःत बदल करत असेल तर आपणही आपल्यामध्ये  बदल करायला हवेत.

डायबेटिस वा मधुमेह, ब्लड प्रेशर वा रक्तदाब असलेले ज्येष्ठ नागरिक यांना कोरोनाचा धोका तुलनेनं जास्ती आहे. त्यांना संसर्ग होऊ शकतो आणि त्यामुळंच ज्यांना यापैकी काहीही नाही, त्यांनी वय वाढणं जरी थांबवता येत नसलं तरी वयोमानपरत्वे येणारे आजार होऊ नयेत, यासाठी जीवनशैलीत बदल करायला हवा, ज्याद्वारे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर किंवा रोग होऊ न देणं, हे उपचारापेक्षा जास्ती श्रेयस्कर असतं हे लक्षात घ्यायला हवं. त्यामुळं, पाऊस पडणं  आपल्या हातात नसलं तरी पावसामुळे निर्माण होणारे धोके आपल्याला पोहचू नयेत, यासाठी सध्यापेक्षा जास्ती काळजी घेणं, आरोग्यपूर्ण जगण्याचा प्रयत्न करणं, कोरोनाच काय कुठलाही विषाणू आला तरी प्रतिकारशक्ती आपल्यात असेल आणि गो कोरोना असं म्हणण्याची वेळ न येता, कुणीही ‘या पराभूत करू’ ही सामूहिक शक्ती आपणा सर्वांत याययला हवी. पावसामुळं सारी सृष्टी हिरवीगार होते, पाऊस सृजनाचा प्रतिनिधी असेल तर ही विजिगीषुवृत्ती म्हणजेच कायम जिंकण्याची वृत्ती हा मान्सूनपूर्व पाऊस आपल्यात निर्माण करो, हाच पावसाचा सांगावं असेल, अशी आशा करू या.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

Web Title : Rain tells keep on winning against coronavirus

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)