प्रवासात सामान चोरीला गेल्यास भरपाईची जबाबदारी रेल्वेवर

Railways Luggage
  • ग्राहक आयोगाचा निकाल सुप्रीम कोर्टाकडून कायम

नवी दिल्ली : प्रवासात प्रवाशाचे सामान चोरीला गेल्यास त्याची भरपाई देण्याची जबाबदारी रेल्वेवर आहे, या राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिलेल्या निकालावर सोर्वच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले.

दिल्लीहून सिकंदराबादला जाताना गाडीतून बॅग चोरीला गेलेल्या एका महिला प्रवाशाला १.३३ लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश जिल्हा ग्राहक मंच, राज्य ग्राहक आयोग व राष्ट्रीय आयोग अशा तिन्ही पातळींवर दिला गेला होता. त्याविरुद्ध रेल्वेने केलेले अपील न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने फेटाळले. एवढेच नव्हे तर एवढ्या क्षुल्लक रकमेच्या भरपाईविरुद्धही रेल्वेने अपील करावे, याविषयी नाराजी व्यक्त केली.

आपण ज्या डब्यातून प्रवास करत होतो तेथील बर्थला सामान कुलूपबंद करून ठेवण्यासाठी साखळी नव्हती. ही बाब आपण ‘टीटीई’च्या निदर्शनास आणून दिली.पण त्यांनी काही केले नाही. शिवाय आरक्षित डबा असूनही आरक्षण नसलेले प्रवासी रात्रभर डब्यात ये-जा करत होते. त्यामुळे बर्थखाली ठेवलेली बॅग चोरीला जाण्यास रेल्वेच जबाबदार आहे, असे या प्रवासी महिलेचे म्हणणे होते.

याउलट रेल्वेने जबाबदारी झटकताना प्रामुख्याने पुढील तीन मुद्दे मांडले होते, जे फेटाळले गेले होते: १) बॅगेत मौल्यवान वस्तू आहेत याची या प्रवाशाने रेल्वेला पूर्वसूचना दिली नव्हती. २) चोरीला गेलेल्या बॅगेत खरंच दागिने व महागड्या साड्या होत्या याचे कोणतेही पुरावे या प्रवासाने दिलेले नाहीत. आणि ३) प्रवासाच्या सामानाच्या बाबतीत प्रवासी आणि रेल्वे यांचे नाते ग्राहक आणि सेवा पुरवठादार असे नसते. कारण प्रवाशाने काढलेले तिकिट हे फक्त प्रवाशाचे असते. प्रवाशाने त्याचे सामान वाहतुकीसाठी स्वतंत्रपणे बूक केले असेल व ते गहाळ झाले किंवा चोरीला गेले तरच रेल्वे भरपाई द्यायला बांधील आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER