रायगडाच्या नाणे दरवाजाची पुनर्बांधणी करणार : खा. संभाजीराजे

Sambhajiraje

रायगड : रायगडावरील नाणे दरवाजा चे संवर्धन करण्याचा प्लॅन तयार आहे. नाणे दरवाजा बहुतांशतः ढासळला होता. स्वतः छत्रपती शिवाजी महाराज याच दरवाज्यातून ये जा करीत असत. या दरवाजाच पुनर्बांधणी केली जाणार असल्याची माहिती खा. संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.

याबाबत माहिती देताना. खा. संभाजीराजे यांनी सांगितले की, गडावर कुठलीही पुनर्बांधणी करायची असेल, तर त्यासाठी पुरावे पाहिजेत. पुराव्याशिवाय काहीही करू शकत नाही. एका घळीत दगडी अवशेष सापडले. कोरीव काम असलेले हे दगड नाणे दरवाजाचे असावेत असे वाटून गेले. हळूहळू शेकडो दगड मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. प्रचंड मेहनत करावी लागली. कारण काही दगड हे जवळपास अर्धा टन वजनाचे होते.

त्यांचा बारकाईने अभ्यास करून त्या प्रत्येक दगडाला नंबर दिला. त्याचे व्यवस्थित डॉक्युमेन्टेशन केले. त्याचा नकाशा तयार करून पाहिला, तर ते दगड नाणे दरवाजाच्या तिथे बरोबर बसत होते.

जवळपास नाणे दरवाजा पुन्हा जशास तास उभा करू शकतो. काही दिवसांमध्येच या दरवाज्याच्या पुनर्बांधणीचे काम सुरू होईल. येत्या काही दिवसांतच शिवभक्तांना हा शिवकालीन दरवाजा परत तसाच पाहायला मिळेल. महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा नाणे दरवाजा उभा करण्याचे स्वप्न होते ते पूर्ण होणार आहे. हे शिवकार्य माझ्या हातून घडत आहे याचा मला एक शिवभक्त म्हणून सार्थ अभिमान असल्याचे खा. संभाजीराजे यांनी सांगितले.