चित्रपट निर्माता फिरोज नाडियाडवालाच्या घरावर धाड; ‘ड्रग्ज’ आणि तीन मोबाईल जप्त

Feroz Nadiadwala

मुंबई : अभिनेता सुशांत राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडचे ‘ड्रग्ज कनेक्शन’ चर्चेत आले. एनसीबीने चौकशी कारवाई सुरू केली. आज चित्रपट निर्माता फिरोज नाडियाडवाला याच्या घरावर धाड टाकून एनसीबीने १० ग्रॅम  गांजा आणि तीन मोबाईल जप्त केलेत. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली पाच  ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. एनसीबी नाडियाडवाला चौकशीसाठी समन्स बजावणार असल्याची माहिती आहे.

पुढे नाडियाडवाला याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. एनसीबीने दोन दिवसांपासून अनेक ड्रग्ज पेडलर्सच्या घरी धाडी टाकल्या. पाच ड्रग डीलर्सना ताब्यात घेतले. या ड्रग डीलर्सच्या चौकशीदरम्यान नाडियाडवाला यांचे नाव उघड झाल्याचे कळते. फिरोज नाडियाडवाला हे बॉलिवूडमधले मोठे नाव आहे.  हेराफेरी, आवारा पागल दीवाना, फूल अ‍ॅण्ड फायनल, वेलकम, कारतूस या गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

सुशांत सिंह  राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर एनसीबीने या प्रकरणाची धडक कारवाई करत, रिया चक्रवर्तीला अटक केली होती. तिच्यासोबत तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती व अन्य लोकांना अटक केली होती. रिया चक्रवर्तीची जामिनावर सुटका झाली आहे. मात्र तिचा भाऊ शौविक अद्यापही तुरुंगात आहे. यापाठोपाठ एनसीबीने दीपिका पदुकोन, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुलप्रीत सिंग या अभिनेत्रींना समन्स बजावत त्यांची चौकशी केली होती. काही दिवसांपूर्वी एनसीबीने बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्सचा भाऊ अ‍ॅगिसिओस डेमेट्रिएड्स  याला अटक केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER