राहुल गांधींच्या निवडणुकीस आव्हान देणारे अपील फेटाळले

प्रकरण चालवायला कोणीच न आल्याचे कारण

rahul Gandhi & Sc

नवी दिल्ली : गेल्या निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभेवर झालेल्या निवडणुकीस आव्हान देणारे अपील, अपिलकर्त्यांतर्फे ते चालवायला कोणीही हजर न राहिल्याने, सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळले.

वायनाडच्या निवडणुकीत ज्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला गेला होता त्या सौरदिवे घोटाळ्यात शिक्षा झालेल्या सरिता एस. नायर यांनी राहुल गांधी यांच्या निवडणुकीस आव्हान देणारी याचिका केरळ उच्च न्यायालयात केली होती. ती गेल्या वर्षी ३१ ऑक्टोबर रोजी फेटाळण्यात आली होती. त्याविरुद्ध नायर यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका (Special Leave Petition) केली होती.

नायर यांची ही याचिका सरन्यायाधीश न्या.शरद बोबडे यांच्या खंडपीठापुढे रीतसर क्रमानुसार पुकारली गेली तेव्हा स्वत: नायर किंवा त्यांचे वकीलही हजर नव्हते. त्यामुळे ती याचिका सर्वांत शेवटी पुन्हा पुकारण्यासाठी मागे ठेवण्यात आली. इतर सर्व प्रकरणांची सुनावणी झाल्यावर नायर यांची याचिका पुन्हा पुकारली गेली तेव्हाही त्यांच्यातर्फे कोणीही उभे राहिले नाही. त्यामुळे हे प्रकरण चालवायला कोणीच पुढे आले नाही, असे नमूद करून खंडपीठाने ती फेटाळली.

उच्च न्यायालयाने नायर यांची याचिका फेटाळताना प्रामुख्याने दोन कारणे दिली होती. एक म्हणजे त्यांच्या याचिकेत खूप त्रुटी व उणिवा होत्या. दुसरे म्हणजे दोन फौजदारी खटल्यांमध्ये शिक्षा झाल्याने नायर मुळातच निवडणूक लढविण्यास अपात्र होत्या.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER