राहुल गांधी राफेलप्रमाणे आताही तोंडावर आपटणार; निलेश राणे, स्मृती इराणींची टीका

Smiriti Irani & Rahul Gandhi & Nilesh Rane

मुंबई : केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बहुमताच्या जोरावर आवाजी मतदानाद्वारे मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात विरोधकांसह शेतकरी संघटनांकडून आवाज उठवला जात आहे. त्यानंतर आता काँग्रेसच्यावतीने पंजाबच्या मोगा जिल्ह्यातून ‘शेती वाचवा’ अभियान सुरू झाले आहे. या तीन दिवसीय अभियानाचे नेतृत्व काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) करत आहेत.

यावरूनच भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आता राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला आहे. “राफेलप्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्येसुद्धा तोंडावर आपटणार.” असे निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. “राफेलप्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्येसुद्धा तोंडावर आपटणार. कृषी बिलाची चर्चा सभागृहात होत असताना राहुल गांधी प्रदेशात होते, शेतकऱ्यांना त्यांचं हित बरोबर कळतं. राहुल गांधींच्या ‘शेती वाचवा’ आंदोलनात, सभांमधून शेतकरी मात्र गायब!” असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुलभीकरण) विधेयक- २०२० आणि शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) करार किंमत आश्वासन आणि कृषीसेवा विधेयक-२०२० ही दोन कृषी विधेयके राज्यसभेत गदारोळात मंजूर करण्यात आली. या विधेयकांविरोधात विरोधकांनी आवाज उठवला आहे. काँग्रेसच्यावतीने पंजाबच्या मोगा जिल्ह्यातून ‘शेती वाचवा’ अभियान सुरू आहे. या अभियानात राहुल गांधी स्वत: ट्रॅक्टर चालवत खेड्यांमधील शेतकऱ्यांची भेट घेत आहेत. या ट्रॅक्टर रॅलीत हजारो शेतकरी सहभागी होणार असल्याचं म्हटलं होतं.

काँग्रेसच्या या रॅलीत मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. मात्र, राहुल गांधींच्या या अभियानाची निलेश राणे यांनी खिल्ली उडवली आहे. तसेच, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीदेखील या आंदोलनावरून राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. “राहुल गांधी हे व्हीआयपी शेतकरी आहेत. ते ट्रॅक्टरवरही सोफा लावून बसतात.

” असं इराणी यांनी म्हटलं आहे. तर, रॅलीवरून हरियाणाचे माजी कृषिमंत्री आणि प्रदेश भाजपा अध्यक्ष ओपी धनखड यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. जर राहुल गांधी यांना राज्यात ट्रॅक्टर रॅली काढायची  असेल तर त्यांनी रॉबर्ट वड्रा यांनाही बरोबर आणावे, असे ओपी धनखड यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर, कुरुक्षेत्रमध्ये ही रॅली थांबविण्यात येणार आहे. मात्र राहुल गांधींच्या ट्रॅक्टर रॅलीला राज्यात प्रवेश करू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER