
नवी दिल्ली :- संरक्षण विषयक संसदीय समितीच्या बैठकीत सैन्य दलातील जवानांचा पोशाख बदलण्याच्या चर्चेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी चांगलेच संतापले. जवानांना कशा पद्धतीचा पोशाख असावा हे समितीतील खासदार ठरवू शकत नाहीत. तो आपला अधिकार नाही, सैन्य दलांच्या प्रमुखांनाच गणवेशाबाबतचा निर्णय घेऊ द्यावा, असं सांगत राहुल गांधी यांनी या चर्चेला विरोध केला. त्यामुळे या समितीचे अध्यक्ष जुएल ओरम आणि राहुल गांधी यांच्या शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे संतापलेल्या राहुल यांनी (Rahul Gandhi) या समितीच्या कामकाजावर बहिष्कार टाकत बैठकीतून निघण्याचा निर्णय घेतला.
संरक्षण विषयक संसदीय समितीचे अध्यक्ष जुएल ओरम यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक संपन्न झाली. या बैठकीला लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्यासह अनेक वरिष्ठ सैन्य अधिकारी उपस्थित होते. लष्कर, हवाई दल आणि नौदलातील जवानांसाठी नव्या स्टाईलचा ड्रेस देण्याबाबतची चर्चा यावेळी करण्यात आली. त्यावेळी भाजपच्या एका खासदाराने अमेरिकन स्टाईलचे ड्रेस जवानांना देण्याची सूचना केली.
भाजप खासदाराच्या या सूचनेला राहुल गांधी यांनी तीव्र विरोध दर्शवला. आजच्या बैठकीला लष्करप्रमुख बिपीन रावत (Bipin Rawat) यांच्यासह अनेक वरिष्ठ सैन्य अधिकारी बसले आहेत. त्यामुळे सुरक्षा दलांच्या जवानांचा ड्रेस कसा असावा? याचा निर्णय त्या त्या दलाच्या प्रमुखांनी घेतला पाहिजे. सुरक्षा दल आणि त्यांच्या युनिटला गौरवाची मोठी परंपरा आहे, त्यामुळे त्यांनाच हा निर्णय घेऊ द्यावा, अशी सूचना राहुला गांधी यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला