नागरिकत्व सुधारणा कायद्यावर राहुल गांधींनी 10 मिनिटे बोलून दाखवावे : नड्डा

Rahul gandhi And JP Nadda

इंदूर : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशभर वातावरण तापलेले असताना भाजप आता या कायद्यावरून निर्माण झालेले गैरसमज दूर करण्यासाठी मैदानात उतरला आहे. देशभर सभा आणि पत्रकार परिषदा घेऊन भाजप सरकारची बाजू मांडणार आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी इंदूरमध्ये आभार सभा घेऊन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनाच थेट आव्हान दिले आहे.

काँग्रेस आणि पक्षाचे नेते गैरसमज पसरवून देशात फुट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचे नड्डा म्हणाले. राहुल गांधी यांनी या विधेयकाच्या तरतूदी काय आहेत यावर फक्त 10 वाक्य बोलून दाखवावी असे मी आव्हान देतो असेही ते म्हणाले. फक्त लोकांच्या भावना भडकावून मतपेटीचे राजकारण केले जात आहे. व्होट बँकेसाठी काँग्रेस कुठल्याही थराला जावू शकते असेही ते म्हणाले.

बिहारमध्येही भडका : उत्तर प्रदेशात मृतकांची संख्या 17

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पश्चिम बंगालचे मंत्री आणि जमीयत उलेमा-ए-हिंद चे प्रदेशाध्यक्ष सिद्दिकउल्ला चौधरी यांनी थेट धमकीच दिली आहे. अमित शहा यांनी हे वादग्रस्त विधेयक मागे घ्यावे. ते जोपर्यंत ते मागे घेणार नाहीत तोपर्यंत त्यांना कोलकत्यात पाय ठेवू देणार नाही असे चौधरी यांनी म्हटले आहे. चौधरींच्या या धमकीमुळे वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. चौधरी म्हणाले, सीएए विधेयक हे घटनाविरोधी आहे. त्यामुळे गरीब आणि मुस्लिमांच्या अधिकारांवर गदा येणार आहे. त्यामुळे हे विधेयक तातडीने मागे घेतले पाहिजे.

अमित शहा कोलकता भेटीवर येणार असतील तर त्यांना विमानतळाच्या बाहेरच पडू दिले जाणार नाही असेही ते म्हणाले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या आधीच या विधेयकाला तीव्र विरोध केला असून पश्चिम बंगालमध्ये हे विधेयक लागू केले जाणार नाही असेही त्यांनी सांगितले आहे.