राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करून दाखवावे, जेवण्याची नौटंकी बंद करावी : आठवले

अकोला: राहुल गांधींनी दलितांच्या घरी जाऊन जेवण करण्याची नौटंकी बंद करावी, त्याऐवजी दलित मुलीशी विवाह करून दाखवावा, असे आव्हान केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधींना केले. आठवले म्हणाले, मी ब्राम्हण मुलीशी विवाह केला आहे. दलित समाजात त्यांच्या योग्य मुली ब-याच आहेत. आठवले येथे आज पत्रकारांशी बोलत होते.

जाती व्यवस्था मोडीत काढण्यासाठी आंतरजातीय विवाह होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रोत्साहनपर रकमेत भरीव वाढ केल्याचे त्यांनी सांगितले. अत्याचार कुठलाही पक्ष करीत नसतो. त्यामुळे भाजपच्या सत्तेत अत्याचार वाढले, असे म्हणणेही योग्य नाही.

दलितांच्या मतांचे विभाजन होऊ नये, म्हणून आपण एकही उमेदवार गुजरातमध्ये उभा करणार नसल्याचे सांगतआठवले म्हणाले, गुजरातमध्ये भाजपला 120 ते 125 जागा मिळतील. गोहत्या बंदीला पाठिंबा असून गोवंश हत्या बंदीला विरोध आहे. कारण बीफ खाण्याचा अधिकार कुणी हिरावून घेऊ शकत नाही. कायद्यातला वंश शब्द काढण्यासाठी आपण आजही आग्रही असल्याचे आठवले म्हणाले.