देशातील जातीव्यवस्था संपवण्यासाठी राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करावे – रामदास आठवले

अकोला: देशातील जातीव्यवस्था संपवण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दलित समाजातील मुलीशी लग्न करावे, असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. ते शनिवारी अकोल्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

देशातील जातीव्यवस्था संपवण्यासाठी आंतरजातीय विवाह होणे गरजेचे आहे. दलित समाजात अनेक उच्चशिक्षीत मुली आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी दलित समाजातील मुलीशी लग्न करावे. मी देखील एका ब्राह्मण मुलीशी लग्न केलेय. तेव्हा राहुल यांनी दलित मुलीशी लग्न करून नवा आदर्श निर्माण करावा. समाजातील जातीव्यवस्था संपवण्याचे महात्मा गांधींजींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राहुल गांधींनी हा निर्णय घ्यावा, असे आठवलेंनी म्हटले. तेव्हा आता राहुल गांधी आठवलेंच्या प्रस्तावावर काय उत्तर देणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वीच दिल्ली येथील कार्यक्रमात भारताचा बॉक्सिंगपटू विजेंदर सिंग याने राहुल गांधी यांना, तुम्ही लग्न कधी करणार?, हा प्रश्न विचारला होता. ‘मी आणि माझी बायको नेहमी म्हणतो की राहुल भय्या कधी लग्न करणार? तुम्ही पंतप्रधान झाल्यानंतर लग्न करण्याची मजाच वेगळी असेल’, असे विजेंदर म्हणाला. तेव्हा राहुल गांधींनी हा खूप जुना प्रश्न आहे, असे सांगत लग्नाचा मुद्दा टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु, विजेंदर आपल्या प्रश्नावर अडून राहिला. सर्व लोक तुमच्या उत्तराची वाट पाहत आहेत, असे सांगत विजेंदरने हा मुद्दा आणखी छेडला. तेव्हा राहुल यांनी मी लग्नाच्याबाबतीत नशीबावर विश्वास ठेवतो. जेव्हा होईल तेव्हा होईल, असे सांगितले.

यावेळी आठवले यांनी राहुल गांधी गुजरातमध्ये करत असलेल्या प्रचाराचे कौतुक केले. गेल्या काही काळात त्यांच्यात सुधारणा झाली आहे. त्यांचा आत्मविश्वासही वाढलाय. त्यामुळे भविष्यात ते एक चांगले नेते व्हावेत हीच माझी इच्छा आहे. ते अधून-मधुन दलितांच्या घरी जाऊन जेवतात, बसतात त्यांना आपले म्हणतात. त्यांना दलित समाजाबद्दल एवढाच आपलेपणा वाटतो, तर त्यांनी दलित मुलीशी लग्न करून देशासमोर आदर्श दाखविणे आवश्‍यक असल्याचे रामदास आठवले म्हणाले.