राहुल गांधी पुन्हा जबाबदारी सांभाळण्यास तयार; होऊ शकतात काँग्रेसाध्यक्ष

Rahul Gandhi

नवी दिल्ली :  काँग्रेसाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला पुन्हा सुरुवात झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी (Rahul Gandhi) पुन्हा काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्यासाठी तयार झाले आहेत. शनिवारी यासंदर्भात सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी १० जनपथ येथे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य आणि पदाधिकारीही उपस्थित होते. ही बैठक तासापेक्षा जास्त वेळ चालली होती. बैठकीत, राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेसाध्यक्षपदाची धुरा सांभाळावी, अशी मागणी करण्यात आली. यावर राहुल गांधी यांनी, पक्ष जी जबाबदारी देईल ती सांभाळण्यास तयार आहे, असे सांगितले.

यांनी केली मागणी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत के. सुरेश, अब्दुल खालिक, गौरव गोगोई आणि काही इतर खासदारांनी, राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पक्षाची धुरा साभाळावी, असा आग्रह केला. या खासदारांशिवाय, काँग्रेसचे वरिष्ठ नेते, दिग्विजय सिंह हेदेखील म्हणाले की, आता राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेसचे नेतृत्व करायला हवे. काँग्रेस कार्य समितीच्या (सीडब्ल्यूसी) बैठकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही अशीच मागणी केली होती. त्यांच्या या मागणीचे अनेक नेत्यांनी समर्थन केले होते.

निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत दिला होता राजीनामा

२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा सपाटून पराभव झाल्यानंतर, या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. राहुल गांधी यांनी त्यांच्या राजीनाम्यात म्हटले होते, ‘काँग्रेस अध्यक्ष म्हणून २०१९ मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत झालेल्या पराभवासाठी मी जबाबदार आहे. आपल्या पक्षाच्या भविष्यासाठी उत्तरदायित्व आवश्यक आहे. यामुळेच मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER