राहुल गांधींनी शब्द पाळला; १२ वर्षीय मुलाला पाठवले स्पोर्ट शूज

Rahul Gandhi - Antony Felix

नवी दिल्ली : काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) गेल्या काही दिवसांत आपल्या राजकीय नाही तर अन्य गोष्टींमुळे जास्त चर्चेत आहेत. मग तो समुद्रात उडी घेत लुटलेला पोहण्याचा आनंद असो की, विद्यार्थ्यांसोबतच्या संवादाच्या कार्यक्रमात मारलेले जोर. आता राहुल गांधी अजून एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. राहुल गांधी यांनी त्यांच्या एका छोट्या फॅनचं मन जिंकलं आहे. राहुल सध्या दक्षिण भारतामध्ये निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. तामिळनाडूत प्रचार करताना कन्याकुमारीमध्ये राहुल यांची भेट अँटनी फेलिक्स या १२ वर्षांच्या मुलाशी झाली होती. या भेटीत राहुल यांनी त्याला मदत करण्याचे वचन दिले होते. ते त्यांनी पूर्ण केले आहे.

राहुल गांधी यांनी अँटनी फेलिक्स या मुलाला स्पोर्ट्स शूज देण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार राहुल गांधी यांनी त्या मुलाला स्पोर्ट्स शूज पाठवले आहेत. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी तामिळनाडूच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी कन्याकुमारीमध्ये त्यांची फेलिक्ससोबत भेट झाली होती. फेलिक्स त्यावेळी पायात काहीही न घालता मुख्यमंत्री के. कामराज यांचं पोस्टर घेऊन उभा होता. त्यावेळी राहुल गांधी यांची नजर त्याच्यावर पडली. त्यावेळी राहुल यांनी आपला ताफा रस्त्याच्या कडेला एका चहाच्या स्टॉलवर चहा पिण्यासाठी थांबवला होता. त्यावेळी राहुल यांनी फेलिक्सला जवळ घेऊन, त्याच्या खांद्यावर हात ठेवत चहाच्या स्टॉलकडे गेले. त्यावेळी फेलिक्ससोबत त्यांनी गप्पागोष्टीही केल्या. त्यावेळी राहुल यांनी त्याच्या आवडीनिवडी विचारल्या. त्यावेळी आपल्याला धावायला आवडत असल्याचं फेलिक्सनं सांगितलं होतं. मग तू पायात काहीही न घालताच धावतो का? असा प्रश्न राहुल यांनी फेलिक्सला विचारला होता.

त्याचबरोबर तुला लवकरच स्पोर्ट्स शूज पाठवून देतो, असा शब्दही राहुल यांनी फेलिक्सला दिला होता. तसंच ट्रेनिंगसाठी एखाद्या अकॅडमीत दाखल होण्यासाठी मदत करतो, असं आश्वासनही राहुल यांनी फेलिक्सला दिलं. दरम्यान, राहुल यांनी पाठवलेले स्पोर्ट्स शूज पाहून फेलिक्सच्या गालावर हसू दिसून आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER