जनेऊधारी पुरोगामी !

rahul gandhi

जेथे गेल्या शतकात जानवे तोडो मोहीम राबविण्यात आली, त्याच पुरोगामी महाराष्ट्रातील तथाकथित विचारवंत आज जानव्याच्या महिमामंडनावर तोंडात मूग गिळून बसलेले आहेत आणि राहुल गांधी यांनी, तसेच त्यांच्या पक्षाने चालविलेला तमाशा असहायपणे (की मुद्दाम ठरवून?) पाहत आहेत. फुले-आंबेडकर आज असते तर त्यांनी राहुलचा, काँग्रेसचा आणि विचारवंतांचा तीव्र निषेध केला असता, याबद्दल माझ्या मनात शंका नाही.

राहुलने केलेली नौटंकी एकाही पुरोगाम्याला निषेधार्ह वाटू नये, याचे मला आश्चर्य वाटते. जानवे हे ब्राह्मणांच्या आणि आणखी काही समाजांच्या (सोनार, सुतार, कोमटी वगैरे) वेगळेपणाचे प्रतीक आहे. त्यापेक्षाही ते ब्राह्मण्याचे, वर्णवर्चस्ववादाचे प्रतीक जास्त आहे, असे सुधारणावादी आणि पुरोगामी मंडळी प्रारंभापासून मानत आली आहे. असे असताना, राहुलने जानव्याचे जे प्रस्थ माजविले त्याची दखल घेतली जाणे अपेक्षित होते. त्याऐवजी, यानिमित्ताने संघ परिवार, भाजपा, पंतप्रधान मोदी यांच्यावर तोंडसुख घेण्याचा अव्यापारेषु व्यापार काही लोक करीत आहेत. त्यांच्या द्रुष्टिदोषाला औषध नाही !

राहुलच्या ‘जानवेगिरी’ला मी तमाशा-नौटंकी यासाठी म्हणतो की, ते शर्टावर जानवे घालून मिरवले. हा चक्क दिखावा आहे. कारण, जानवे उघड्या अंगावर घालतात आणि ते घातल्याची शोबाजी करण्याची गरज नसते. येथे तर राहुलसोबत आणखी काही काँग्रेसनेते शर्टावरून जानवे घालून त्याचा प्रचार होईल याची काळजी घेताना दिसतात. म्हणून हे नाटकच!

दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा की, असे करण्याची गरज काय? हिंदुत्वाला विरोध, हिंदुत्ववाद्यांना विरोध, ब्राह्मणवादाला विरोध ही जर आपली परंपरा आहे, तर स्वत: ब्राह्मण असल्याचे सिद्ध करण्याचा एवढा सोस कशासाठी? मातुल कुलाचे गोत्र सांगण्याचा अट्टहास का? आपल्याकडील पुरुषसत्ताक पद्धतीत गोत्र पित्रुकुलाचे असते. त्या न्यायाने राहुलचे गोत्र त्यांचे वडील राजीव गांधी यांचे हवे. पण, राजीवजींचे वडील फिरोज गांधी. त्यांना कुठले गोत्र? म्हणून आजी इंदिरा गांधी यांचे गोत्र घेण्यात आले! या दत्तात्रेय गोत्राचाही वाद झाला. सनातन्यांचे म्हणणे असे की, या नावाचे गोत्रच नाही! एकाने मात्र शोधून काढले की, काश्मिरी पंडितांमध्ये दत्तात्रेय गोत्र आहे. त्यांच्यात १९९ गोत्र आहेत म्हणे. क्षणभर असे ग्रुहीत धरले की, हे गोत्र अस्तित्वात आहे, तरी राहुलला ते कसे लागू होते, हा प्रश्न आहे. नेहरूंचे गोत्र गांधींना कसे? उत्तर सोपे आहे. नेहरूंचा वारसा मोठा आणि मिरवण्यासारखा आहे. त्यातून राजकीय लाभ आहे. फिरोज गांधींचे नाव सांगून काय मिळणार? ते तर नेहरूंचे विरोधक, त्यांचे नावडते आणि वेळोवेळी त्यांना अडचणीत आणणारे जावई होते!

मुळात माझा आक्षेप राहुलने जानवे घालण्यावर, गोत्र सांगण्यावर आणि तथाकथित पुरोगामी विचारवंतांनी तोंड शिवून बसण्यावर आहे. त्यांना हे शोभत नाही. एरवी हिंदूंच्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसून थयथयाट करायचा आणि राहुलच्या ब्राह्मणत्वाला मात्र मूक संमती द्यायची, हा शुद्ध ढोंगीपणा आहे! जनेऊधारी पुरोगामित्वाच्या बुरख्याआडील प्रतिगामित्व!!

विनोद देशमुख