
मुंबई : राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडीमधील पक्ष विशेषतः काँग्रेस नाराज असल्याने सारे काही आलबेल नसल्याची चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात बुधवारी फोनवरून चर्चा झाली. त्यामुळे महाविकास आघाडीतील तणाव निवळला असल्याचे समजते. तर मुख्यमंत्र्यांपाठोपाठ राहुल गांधी यांनी महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशीही फोनवरून संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी महाराष्ट्र सरकारच्या कामाचे कौतुक केले. तसेच राज्यातील कोरोना रुग्णांची वाढ चिंताजनक असल्याचे म्हणत चाचण्या वाढविण्याचा सल्लाही दिला.
ही बातमी पण वाचा:- ‘ठाकरे’ सरकार स्थिर, राहुल गांधी यांच मुख्यमंत्र्यांना आश्वासन
गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजभवनावरील वाढलेल्या भेटीगाठींमुळे राज्यात राष्ट्रपती राजवटीची चर्चा सुरू झाली होती. त्यातच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीवर बोलताना मंगळवारी एक वक्तव्य केले होते. महाराष्ट्रात आमचा सरकारला पाठिंबा आहे. मात्र, आम्ही निर्णयप्रक्रियेत नाही,’ असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत सारे काही आलबेल नसल्याचे चित्र पुढे आले होते.
दरम्यान या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात काल चर्चा झाली. यावेळी ‘सरकारमध्ये काँग्रेसचा यथोचित सन्मान राखला जाईल. काँग्रेसला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची सरकारची भूमिका राहिली आहे. यापुढेही राहील,’ असे मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांना सांगितले. तर, राहुल गांधी यांनीही काँग्रेस ठामपणे सरकारच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. तसेच कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी काँग्रेस पक्ष सरकारला सर्वतोपरी मदत करेल, असेही राहुल यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
तसेच आम्ही उद्धव सरकारच्या पाठीशी आहोत, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केल्यानंतर महाराष्ट्रात सर्व मित्रपक्ष एकत्र असून महाराष्ट्र सरकार स्थिर असल्याचेही शिवसेनेने म्हटले आहे. आता राहुल गांधी यांनी आदित्य ठाकरे यांच्याशी बोलून सर्व प्रकारच्या अफवा थांबविल्या आहेत. आज तक वृत्त वाहिनीने हे वृत्त दिले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला