राहुल गांधी काँग्रेसला नवसंजीवनी देऊ शकतील; जनतेचा कौल

Rahul Gandhi

नवी दिल्ली :- मागील काही वर्षांपासून राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षाची भूमिका बजावत असलेल्या काँग्रेससमोर आता अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. काँग्रेसची (Congress) धुरा कोणाच्या हातात द्यायची, असा महत्त्वाचा प्रश्न काँग्रेससमोर उभा ठाकला आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काँग्रेसध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून पदाची धुरा सोनिया गांधी यांच्याकडे आहे.

मात्र, काँग्रेसला राहुल गांधी हेच नवसंजीवनी देतील, असं एका सर्वेक्षणात दिसून आलं आहे. देशातील राजकीय, आर्थिक, राष्ट्रीय सुरक्षा, कोरोना (Corona) परिस्थितीसंदर्भात ‘इंडिया टुडे ग्रुप’ आणि ‘कार्वी इनसाइट्स’ने सर्वेक्षण केले. ‘मूड ऑफ द नेशन- २०२०’ नावानं करण्यात आलेल्या पाहणीत काँग्रेससंदर्भातही प्रश्न विचारण्यात आला होता. “काँग्रेसला पुन्हा उभारी देण्यासाठी कोणता नेता योग्य आहे, असं तुम्हाला वाटतं?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना सर्वांत जास्त भारतीयांनी राहुल गांधी यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे.

२३ टक्के नागरिकांना वाटतं की, राहुल गांधी काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी देऊ शकतात. राहुल गांधी यांच्यापाठोपाठ माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नावाला पसंती दिली आहे. १८ टक्के भारतीयांना वाटतं की, मनमोहन सिंग यांचं नेतृत्व काँग्रेसला उभारी देऊ शकतं. १४ टक्के लोकांनी माहिती नाही, असं उत्तर दिलं. तर १४ टक्के लोकांना वाटतं प्रियंका गांधी या काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी योग्य नेत्या ठरू शकतात.

१४ टक्के लोकांना वाटतं सोनिया गांधी काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस आणू शकतात. या सर्वेक्षणात १९४ विधानसभा मतदारसंघ आणि ९७ लोकसभा मतदारसंघांतील १२ हजार १४१ जणांना सहभागी करून घेण्यात आलं होतं. यामध्ये शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांतील लोक सहभागी होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER