पदार्पणातच मोठ्या खेळींची सवय लागलेला अफगाणी रहमानुल्ला

अफगणिस्तान (Afghanistan) क्रिकेट म्हटले की राशिद खान व मोहम्मद नबी ही दोनच नावे पटकन आठवतात. आता या नावात तिसऱ्या नावाची भर पडेल असे दिसतेय आणि ते नाव म्हणजे रहमानुल्ला गुरबाज (Rahmanulla Gurbaz) . राशिद व नबी या दोघांनी गोलंदाजीत नाव कमावलेय, आता रहमानुल्लाह फलंदाजीत नाव कमावेल असे दिसतेय. तसा तो यष्टीरक्षक आहे पण फलंदाज म्हणूनच त्याने सुरुवातीला आपली छाप पाडली आहे.

गेल्याच आठवड्यात त्याने वन डे इंटरनॅशनल क्रिकेटच्या पदार्पणात शतक झळकावले. त्यावेळी आयर्लंडविरुध्द त्याने 127 चेंडूत 127 धावा केल्या होत्या आणि क्रिकेटमध्ये पदार्पणातच आंतरराष्ट्रीय शतक झळकावणारा 21 व्या शतकात जन्मलेला (जन्मतारीख 28 नोव्हेंबर 2001) तो पहिलाच पुरुष क्रिकेटपटू ठरला. योगायोगाने 21 व्या शतकाच्या 21 व्या वर्षाच्या 21 व्या दिवशीच त्याने हा विक्रम केला होता. पण एवढ्याने तो फलंदाजीत चमकेल असे कसे म्हणता येईल. पण तसे म्हणायलासुध्दा आधार आहे त्याच्या विविध प्रकारच्या सामन्यांतील पदार्पणातील कामगिरीचा. कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटच्या पदार्पणातच चांगली कामगिरी करायची त्याला जणू सवयच आहे.

2019 मध्ये त्याने टी 20 च्या आंतरराष्ट्रीय पदार्पणातच त्याने 24 चेंडूत 43 धावांची खेळी केली. त्याचवर्षी बांगलादेश प्रीमीयर लीगच्या पदार्पणातही त्याने केवळ 18 चेंडूतच अर्धशतकाची खेळी केली. गेल्या वर्षी लंका प्रिमियर लीगमध्येही त्याने पदार्पणातच 21 चेंडूत अर्धशतक साजरे केले, त्यानंतर वन डे इंटरनॕशनलच्या पदार्पणात त्याने आयर्लंडविरुध्द 127 चेंडूत 127 धावा फटकावल्या आणि आता ताज्या खेळीत गुरुवारी अबू धाबी येथे टी-10 लीग क्रिकेटच्या पदार्पणात त्याने दिल्ली बुल्स संघासाठी 15 चेंडूतच 41 धावा तडकावल्या. एक दोन नव्हे तर पाच प्रकारच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पदार्पणातच अशा खेळी केल्यावर भविष्यातही रहमानुल्ला गुरबाज हा अफगणिस्तानचा नंबर वन फलंदाज बनेल ही अपेक्षा बाळगणे चुकीची नाहीच.

19 वर्षांचाच असला तरी आपल्या या प्रभावी पदार्पणांबद्दल रहमानुल्लाने एखाद्या अनुभवी खेळाडूसारखी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणतो, वन डे इंटरनॅशनलच्या पदार्पणातच शतकाची कामगिरी केल्याचा आनंद आहे. अल्लाह आणि तुमच्या सर्वांच्या सदिच्छांची कृपा आहे. सोबतच सर्व क्रिकेटप्रेमींचा पाठिंबा आणि सदिच्छांसाठी मी आभारी आहे. भविष्यातही त्याची मला गरज भासणारच आहे.

पदार्पणातील आपल्या या चांगल्या कामगिरींबद्दल तो म्हणतो की, वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार खेळासाठीच्या विचारसरणीत केलेला बदल आपल्याला फायदेशीर ठरला. संयमाने खेळायचे, नव्या चेंडूंचाआणि चांगल्या चेंडूंचा सन्मान करायचा आणि स्वतःवर दडपण न येऊ देता आपला नैसर्गिक खेळ करायचा हे वरिष्ठांचे मार्गदर्शन आपल्यासाठी मोलाचे ठरल्याचे तो सांगतो. पाय रोवून खेळतानाच स्ट्राईक रोटेट करत राहणे आपल्याला महत्त्वाचे वाटते असेही त्याने सांगितले.

आता 19 वर्षे वयातच त्याच्या नावावर जे काही विक्रम लागले आहे त्यात मिताली राज व सलीम इलाही यांच्यापाठोपाठ सर्वात कमी वयात (19 वर्ष 54 दिवस) वन डे इंटरनॅशनल पदार्पणात शतक, वन डे इंटरनॅशनल पदार्पणाच्या खेळीतच सर्वाधिक षटकार (9), पदार्पणातच शतक करणारा अँडी फ्लॉवर व रेश्मा गांधीनंतरचा पहिलाच यष्टीरक्षक, पदार्पणातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या (127), वन डे इंटरनॅशनल पदार्पणात सलामी फलंदाजाचे सर्वात जलद अर्धशतक (38 चेंडू), 21 व्या शतकात जन्मलेला केवळ दुसराच आंतरराष्ट्रीय शतकवीर (पहिली युगांडाची महिला क्रिकेटपटू प्रोस्कोव्हिया अलाको) असे विक्रम त्याच्या नावावर लागले आहेत आणि ज्याप्रकारे सुरुवात केली आहे ते पाहाता आणखी बरेच विक्रम तो आपल्या नावावर करेल अशी चिन्हे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER