राहीबाई आणि डिसले गुरुजी आजचे दीपस्तंभ !

rahibai & Disley Guruji

Shailendra Paranjapeडिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग अध्ययन आणि अध्यापनामध्ये करत शिक्षण कालसुसंगत करण्याची गरज आहे, असं मत ग्लोबल टीचर अवॉर्ड अर्थात जागतिक पातळीवरचे सर्वोत्तम शिक्षक ठरलेल्या रणजितसिंह डिसले गुरुजींनी व्यक्त केले आहे. डिसले गुरुजींचे नाव ग्लोबल टीचर पुरस्कारामुळे जगभर गेले. त्यांनी अंगीकारलेल्या पद्धतीतून केवळ अध्यापनच नव्हे तर सारं जगणंच अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं कसं सोपं करता येतं, प्रश्न झटकन सुटतात, याचं प्रात्यक्षिकच बघायला मिळतं. त्याबरोबरच केवळ विद्यार्थ्यांना शिकवणं, यापेक्षाही शिक्षकांची गुणवत्ता वाढावी, हा डिसले गुरुजींचा (Disale Guruji) विचार विशेष लक्षात घेण्यासारखा आहे.

आपल्या प्राचीन पारंपरिक शिक्षण पद्धतीत गुरु-शिष्य परंपरा होती. गुरुगृही राहून विद्यार्थी अध्ययन करत असे आणि विविध विषयांसह जीवन शिक्षणही मिळवत असे. काळ बदलला तसं शिक्षणही बदलत गेलं. गेल्या हजार वर्षांत आक्रमकांच्या आणि मुघल शासकांच्या पगड्यामुळे मराठी भाषेत फारसी-उर्दू शब्द सहज येऊन विराजमान झाले. प्रतिष्ठाही पावले. तीच गोष्ट इंग्रजी शब्दांचीही. आज कोणीही पटकन शर्टला अंगरखा किंवा पँटला विजार म्हणाला तर त्याला समस्त मराठी भाषक वेड्यात काढतील, अशी स्थिती आहे. जो समाज आपली भाषा विसरतो, तो दास्यत्वाकडे जातो, असे विचार एका विचारवंताने व्यक्त केले आहेत. भाषाशुद्धीबद्दल प्राचीन काळापासून लोक आग्रही असत; पण गेल्या शंभर वर्षात बोलीभाषा आणि लेखीभाषा असे भेद होऊ लागले. त्यातून वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके यामधून लेखी भाषा तरी अचूक असावी हा आग्रह धरला जात असे. तीच गोष्ट आकाशवाणी म्हणजेच रेडिओ या माध्यमातून वापरल्या जाणाऱ्या भाषेची. त्यामध्ये मोठा बदल झालाय तो टीव्ही वाहिन्यांमुळे आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या बोलीभाषेमुळे.

मराठी अग्रगण्य वृत्तपत्रातून १९९० च्या दशकात अस्खलित मराठीच्या आग्रहाऐवजी बोलीभाषेचा आग्रह धरला जाणं काही जणांना चक्रावून टाकणारं होतं. पण आता बोली आणि लेखी भाषा सारख्याच अशुद्ध होत चालल्याचं दिसतं. त्यामुळे डिसले गुरुजींनी व्यक्त केलेली अपेक्षा आवर्जून लक्षात घ्यायला हवी. शिक्षण क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करून घ्यायला हवा, ही त्यांनी व्यक्त केलेली अपेक्षा रास्तच आहे. दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यातल्या बीजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपेरे यांना भारतीय संसदेत भाषण देण्यासाठी बोलावण्यात आलंय. या गोष्टीतला संदेश हाही आहे की, अद्ययावत तंत्रज्ञानाबरोबरच देशीपणही टिकवण्याची गरज आहे. राहीबाईंनी देशी वाणांची बँक अर्थात बीजपेढीच तयार केली आणि त्यामुळे त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

राहीबाईंना बाएफ या संस्थेने सहकार्य केले आहे आणि बाएफ ही संस्था मणिभाई देसाई या गांधीवादी विचारांच्या सेवाव्रतीच्या कार्यातून उभी राहिली आहे. राहीबाईंचा गौरव झालाय तो पारंपरिक देशी वाण टिकवण्यासाठी आणि डिसले गुरुजी अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गावखेड्यातल्या विद्यार्थी-शिक्षकांना जगाच्या स्पर्धेत नेऊ पाहताहेत. डिसले गुरुजींनी दिलेला संदेश लक्षात घेऊन शिक्षण पद्धतीत डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होणं गरजेचं आहे. त्याबरोबरच राहीबाईंनी दिलेला संदेशही अंगीकारायला हवा. त्याद्वारे शेती असो की शिक्षण, प्राचीन परंपरेसह अद्ययावत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला तर गावखेड्यातल्या शिवारात हिरवी रानं फुलतील आणि शाळाशाळांमधून देशाला, जगाला नेतृत्व देणारे तरुण पुढे येतील. त्यासाठी राहीबाई आणि डिसले गुरुजी या आजच्या युगातल्या दीपस्तंभांकडून येणारे प्रकाशकिरण टिपत राहायला हवेत.

शैलेंद्र परांजपे

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER