राफेल नदालने केला असा विक्रम जो फेडररला शक्य नाही..

Rafael Nadal

टेनिसमध्ये (Tennis) फेडरर (Federer) – नदाल (Nadal) – जोकोवीच (Djokovic) यांची स्पर्धा सर्वांनाच माहित आहे पण आपल्या सातत्याच्या जोरावर या तिघांमध्ये राफेल नदालने आता असा विक्रम केलाय जो फेडररला गाठणे तर शक्यच नाही आणि जोकोवीचसाठी मोठे आव्हान आहे.

गेल्या आठवडाअखेर नदाल हा टेनिसच्या एटीपी (ATP) जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे आणि गेल्या तब्बल 788 आठवड्यांपासून तो सतत टॉप – 10 मध्ये कायम आहे. या विक्रमाचं महत्त्व यासाठी आहे की फेडरर व जोकोवीचसह इतर कुणीही या विक्रमाच्या जवळपाससुध्दा नाहीत.

788 आठवडे टॉप 10 मध्ये राहताना नदालने अमेरिकेच्या जिमी काॕनर्स (Jimmy Connors) यांना मागे टाकले. काॕनर्स हे 787 आठवडे सलग टॉप 10 मध्ये होते.

फेडररप्रमाणेच 20 ग्रँड स्लॕम विजेतेपदं आपल्या नावावर असणारा नदाल हा 2005 मध्ये पहिल्यांदा टॉप 10 मध्ये पोहोचला होता. तेंव्हापासून तो एकदाही टॉप- 10 च्या बाहेर गेलेला नाही. आणि नदालचा सध्याचा फाॕर्म पाहता तो या 788 आठवड्यांच्या विक्रमात आणखी कितीतरी आठवड्यांची भर घालेल हे निश्चित आहे.

विशेष म्हणजे या दरम्यानच्या काळात 2015 व 2016 मध्ये तो दुखापतींनी त्रस्त होता तरीसुध्दा त्याने टॉप टेनमधील आपले स्थान कायम राखले होते. 2015 मध्ये त्याची कामगिरी फारशी चांगली नव्हती आणि त्यामुळे तो 10 व्या स्थानी घसरला होता पण टॉप टेनमध्ये कायम होता.

राफेलच्या सातत्याचे उदाहरण म्हणजे 2005 मध्ये त्याने पहिले ग्रँड स्लॕम विजेतेपद पटकावले तेंव्हापासुन 2015 व 2016 चा अपवाद वगळता त्याने दरवर्षी किमान एकतरी ग्रँड स्लॕम स्पर्धा जिंकली आहे. ग्रँड स्लॕम खालोखाल महत्त्वाच्या असणाऱ्या मास्टर्स 1000 दर्जाच्या स्पर्धासुध्दा त्याने 2015 व यंदा वगळता 2005 पासून दरवर्षी जिंकली आहे.

त्याचे प्रतिस्पर्धी फेडरर व जोकोवीच हेसुध्दा दीर्घकाळ टॉप 10 मध्ये आहेत. नदाल व कॉनर्स यांच्यानंतर फेडरर सलग 734 आठवडे टॉप 10 मध्ये होता. 2016 मध्ये दुखापतीमुळे तो काही स्पर्धा खेळू शकला नाही. त्यामुळे त्याची ही मालिका खंडीत झाली. 2016 मध्ये तो क्रमवारीत 16 व्या स्थानापर्यंत खाली गेला होता.

जोकोवीच या यादीत सलग 555 आठवड्यांसह सहाव्या स्थानी आहे. पण त्यात खंड पडलाय. 2017 मध्ये तो दुखापतींनी त्रस्त होता तेंव्हा तो क्रमवारीत 12 व्या स्थानी पोहोचला होता. मात्र नदालने गेल्या तब्बल 15 वर्षांपासून सातत्य कायम राखले आहे आणि सलग एवढी वर्षै स्पर्धात्मक टेनिसमध्ये असे सातत्य राखणे सोपे नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER