राधिका सांगणार बालगोष्टी

Radhika Deshpande

आपण कलाकारांना नेहमीच कॅमेर्‍यासमोर किंवा पडद्यावर अभिनय करताना पाहत असतो. फार तर काही कलाकार हे अभिनयासोबत गाणं गातात तसेच पडद्यामागे देखील ते वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत असतात. पण या पलीकडे जाऊन अनेक कलाकार त्यांचे वेगवेगळे छंद जोपासत असतात आणि ते लोकांसमोर सादर करत असतात. अभिनेत्री राधिका देशपांडे (Actress Radhika Deshpande) हिला देखील लेखनाची खूप आवड आहे. ती साहित्यामध्ये नेहमीच रमते आणि नुकताच तिने एक बालनाट्य गोष्टींचा संग्रह लिहून पूर्ण केला आहे. सोशल मीडिया पेजवर तिने तिच्या या वेगवेगळ्या बालनाट्य कथांची पुस्तकमालिका पोस्ट केली आहे. राधिकाच्या या वेगळ्या छंदाचं रुपांतर आता तिने साहित्यकृतींमधून समोर आणले. तिच्या अभिनयाचे चाहते असलेल्यांकडून तिच्या लेखणीला देखील तितकीच कौतुकाची दादही मिळत आहे.

पुण्याची असलेली राधिका देशपांडे लहानपणापासूनच अभिनय आणि लेखनामध्ये आवड असणारी मुलगी. तिने शालेय वयात बालनाट्यमध्ये देखील काम केले आहे. होणार सून मी या घरची या मालिकेत नायिका जान्हवीची मैत्रीची म्हणजेच गीताची भूमिका राधिका देशपांडे हिने लोकप्रिय केली होती. तिच्या अभिनयाने या मालिकेतून ती खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचली. मात्र त्यापूर्वी तिने एकांकिका, प्रायोगिक नाटक, रंगभूमीवर देखील खूप काम केलं आहे. सध्या ती आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधती ची मैत्रीण देविकाच्या भूमिकेमध्ये दिसत आहे.

राधिका देशपांडे सतत वेगवेगळ्या गोष्टी लिहीत असते. वेगवेगळ्या गोष्टींवर ती लेखणीच्या माध्यमातून व्यक्त होत असते. खरे तर पडद्यावरचे तिचं नाव राधिका देशपांडे असलं तरी साहित्यविश्वात ती रानी या नावाने लेखन करत असते. त्यामुळे या बालनाट्य पुस्तकांसाठी देखील तिने रानी हेच नाव लेखिका म्हणून घेतले आहे. तिच्या या संग्रहामध्ये कटी पतंग आणि इतर बालनाट्य, मुंबई आणि इतर तीन बालनाट्य संग्रह मगिस्टा, आणि त्रिकूट बालनाट्याचे अशी मेजवानी आहे. बालनाट्य घेऊन रानी म्हणजेच पडद्यावरची राधिका देशपांडे बालकलाकार यांच्या जगात वेगवेगळ्या गोष्टी घेऊन आली आहे. त्यातच लहानपणापासून बालकलाकार म्हणून काम करत असल्यामुळे तिला बालनाट्यमधलं लेखन कौशल्य माहित आहे. शिवाय लहान मुलांच्या नाटकांमध्ये, कथांमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी रंजक ठरू शकतात याचीही तिला नस सापडली आहे. याचाच फायदा करून घेत गेल्या काही दिवसांपासून बालनाट्य मध्ये स्वतःचे लेखन कौशल्य सिद्ध करून दाखवत आहे. राधिकाला एक मुलगी असल्यामुळे तिला तिच्या मुलीकडून देखील या बालसाहित्य लेखनविषयी सतत वेगवेगळ्या गोष्टी नव्याने कळत असतात.

राधिका सांगते, मी लिहिलेल्या कुठल्याही बाल साहित्याची पहिली वाचक माझी मुलगी आहे. ती मला लहान मुलांच्या मनातील अनेक प्रश्न, त्यांच्या जिज्ञासा, त्यांना कुठल्या गोष्टीवर कुतूहल वाटतं हे मला सांगत असते आणि त्यामुळेच मला लहान मुलांसाठी लिहित असताना वेगवेगळ्या संकल्पना लहान मुलांना आकर्षित करू शकतील हे समजते. त्यामुळे मला बालनाट्य लिहिताना खूप मजा येते. खरेतर लेखिका म्हणून लहान मुलांसाठी काही लिहिणं हे खूप आव्हानात्मक आहे हे मला जाणीवपूर्वक माहित आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये या निमित्ताने आपण लहान मुलांसारखा विचार करतो याचा मला खूप जास्त आनंद होतो असेही राधिका आवर्जून सांगते. ती वृत्तपत्रांमध्ये तसेच मासिकांमध्ये देखिल वेगळ्या विषयांवर गंभीर लेखन करत असतेच परंतु या बालनाट्य निमित्ताने राधिकाचा एक वेगळा लेखनबाज तिच्या चाहत्यांना आणि तिच्या वाचकांना मिळणार आहे. सिनेमा, मालिका, रंगभूमी आणि आता बालनाट्य लेखन अशा वेगवेगळ्या विषयात राधिकाने तिची एक ओळख जपली आहे. वैयक्तिक आयुष्यात राधिका खूप रोखठोक आणि बिनधास्त मुलगी आहे. लहान मुलांमधील निरागसता तिला एक व्यक्ती म्हणून खूप आवडते आणि हे लहान मुलांचे भावविश्व आहे. लेखनाच्या माध्यमातून, बाल नाट्य च्या रूपाने मांडत असताना तिचाही कस लागला.

सध्या लहान मुलं मोबाईल मध्ये गुंतलेली आहेत. इंटरनेटमध्ये रमत असतात. आपल्याला जर लहान मुलांना पुन्हा एकदा वाचनाची गोडी लावायची असेल तर त्यांना आवडणाऱ्या गोष्टी आपण त्यांच्या साहित्यातून दिल्या पाहिजेत असे राधिका मत आहे. तिच्या बालनाट्य पुस्तक मालिकेला लहान मुलांचा कसा प्रतिसाद मिळतो हे देखील तिला लवकरच कळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER