राधिका मसालेच्या मालकीणबाई येणार हसवायला

Radhika Subhedar

अनेक कलाकारांच्या आयुष्यात त्यांना अशी एक भूमिका मिळते की त्यांच्या खऱ्या नावापेक्षा त्या ऑनस्क्रीन नावानेच त्यांना ओळख मिळते. चार वर्षे गाजलेल्या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री अनिता दाते हिच्या आयुष्यातही राधिका सुभेदार हे नाव आलं आणि या नावाने गारूड केलं. अनितानेही तिच्या अभिनयाने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील राधिका सुभेदार (Radhika Subhedar) या पात्राला न्याय दिला. एक साधी गृहिणी नवऱ्याचा बाहेरख्यालीपणा सहन न करता मसाले उत्पादन करून मोठी उद्योजिक बनते असा तिचा प्रवास या मालिकेत पहायला मिळाला होता. ही मालिका संपल्यानंतर ऑनस्क्रिन राधिकाला तिच्या चाहत्यांनी जितकं मिस केलं तितकं अनितानेही केलं. आता ही मालिका संपल्यानंतर अनिता कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले होते. त्यामुळे तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

अनिता लवकरच चला हवा येऊ द्या या हास्य
मालिकेत प्रेक्षकांना हसवताना दिसणार आहे. खरंतर तिची मालिका सुरू असताना सेलिब्रिटी म्हणून अनिता अनेकदा यामलिकेच्या सेटवर आली होती. तिच्या मालिकेची, राधिकाची नक्कल होत असताना खळखळून हसली होती, पण आता हास्याचे पंच मारण्यासाठी अनिता सज्ज झाली आहे.

अनिताने यापूर्वी अनेक मालिका, नाटक, सिनेमा यामध्ये छोट्यामोठ्या भूमिका केल्या आहेत. पण पूर्णपणे विनोदी अभिनय तिने कधीच केला नव्हता. त्यामुळेच हवा येऊ दया या शोमध्ये अनिता विनोदाचे टायमिंग कसे पकडते हे पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. अनिताने यासाठी विनोदी कलाकारांच्या टायमिंगचा अभ्यास केला आहे. अनिता सांगते, माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेने मला ओळख दिली. यापूर्वी काही सिनेमा, नाटकात मी विनोदी सीन केले आहेत, पण पूर्णपणे विनोदी स्कीटवर आधारीत असलेल्या चला हवा येऊ द्या या शोमध्ये सहभागी होताना एक दडपण आहे. मुळात जेव्हा मी माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका करत होते, तेव्हा या शोच्या सेटवर आले होते. माझ्या मालिकेतील पात्रांची, कथेची नक्कल करत असतात हवा येऊ द्या या शोमधील कलाकार किती मेहनत घेतात हे मी अनुभवले आहे. कुशल, भाऊ यांनी राधिकाचं पात्र या शोमध्ये साकारलं होतं. पण समोर बसून हा शो पाहणं, त्यातील विनोदावर हसणं हे सोपं आहे, प्रत्यक्ष स्कीट करताना मला खूप तयारीने यावं लागणार आहे याची मला कल्पना आहे. पण म्हणतात ना, प्रेक्षकांना रडवणं सोपं आहे पण हसवणं अवघड, हेच अवघड काम मला पेलावं लागणार आहे.

माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका संपल्यानंतर अनिता काही दिवस सुट्टीवर होती. पण तोपर्यंत कोरोनाचे संकट वाढले.

या दरम्यान नवीन काय करावे असाही विचार अनिता करत होती आणि याचवेळी तिला हवा येऊ द्यामध्ये सहभागी होण्याची ऑफर आली. सध्या या शोमध्ये श्रेया बुगडे आणि स्नेहल शिदम या महिला कलाकार हास्याचा धुरळा उडवत आहेत. त्यांच्या हरहुन्नरी आणि वैविध्यपूर्ण अभिनयासोबत आता अनिताचे पंच दिसणार आहेत. यापूर्वी हवा येऊ दया या शोमध्ये बरेच प्रयोग केले आहेत. होऊ दया व्हायरल यामधून नव्या विनोदवीरांना संधी दिली ज्यातून स्नेहल शिदमने बाजी मारली. तर एरव्ही मालिकेच्या नायिका म्हणून चौकटीतल्या भूमिका करणाऱ्या अभिनेत्रींच्या विनोदी अभिनयाला वाव देण्यासाठी लेडीज स्पेशल हे खास सेगमेंट सुरू केले. यातून अभिज्ञा भावे, गायत्री दातार, स्नेहलता, मोनालिसा यांनीही त्यांच्या विनोदी अभिनयाचा ठसका दाखवला आहे. त्यामुळे या शोमध्ये अनिताचे हास्यफवारे किती लांब उडतात आणि ती कोणती नवी स्टाइल या शोमध्ये आणते हे लवकरच दिसणार आहे.

कोरोना लॉकडाउनमुळे महाराष्ट्रात शूटिंगला बंदी असल्याने मनोरंजनक्षेत्रातील शो, मालिकांचे शूटिंग महाराष्ट्राबाहेर सुरू आहे. त्यामुळेच चला हवा येऊ द्या या शोची टीम सध्या राजस्थानमधील जयपूर येथे शूटिंग सुरू आहे. अनिता या शोमध्ये सहभागी होण्यासाठी जयपूरला पोहोचली असून लवकरच ती या शोमध्ये दिसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button