नगर जिल्हा बॅंक निवडणुकीत थोरात विरुद्ध विखे ?

अहमदनगर : राज्यातील सर्वात सक्षम जिल्हा बँक (District Bank) म्हणून नगरचा लौकिक आहे. त्यामुळे राज्यस्तरावर या निवडणुकीला महत्त्व आहे. दरवर्षी ही निवडणूक कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) अशी रंगत असते. यंदाही राजकीय परिस्थिती बदलली असली तरी बॅंकेच्या निवडणुकीत थोरात विरुद्ध विखे असाच सामना रंगेल असेच सध्याचे वातावरण आहे.

बँकेच्या संचालक मंडळावर साखर कारखानदारांचे पूर्ण वर्चस्व आहे. राज्याच्या सत्तेमधील राजकीय परिस्थिती कशीही असली तरी जिल्ह्य़ाच्या सहकारातील गटतटाची समीकरणे कशी जुळली जातात यावरच बँकेतील सत्तेची समीकरणे ठरतात. बँकेवर थोरात गटाचे वर्चस्व असले तरी थोरातांना स्वबळावर बँकेतील सत्ता कधी मिळालेली नाही. तीच परिस्थिती विखे गटाची आहे. थोरात गट व राष्ट्रवादी यांच्या समीकरणाचे सूत लवकर जुळते. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. पूर्वी थोरात गटासमवेत असलेले राष्ट्रवादीचे अनेकजण आता भाजपामध्ये आहेत. बँकेच्या निवडणुकीत राजकीय पक्षांच्या भूमिकांना फारसे महत्त्व नाही. साखर कारखानदारांचे हितसंबंध लक्षात घेऊनच सत्तेची समीकरणे जुळवली जातात.

पाच वर्षांपूर्वीच्या बँकेच्या निवडणुकीवेळी विखे काँग्रेसमध्येच होते. त्यावेळीही काँग्रेसमधीलच थोरात समर्थक, राष्ट्रवादीमधील ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, ज्येष्ठ नेते मधुकर पिचड समर्थक, आशुतोष काळे (चैत्राली काळे), आ. अरुण जगताप, भाजपमधील बिपीन कोल्हे, (कै.) राजीव राजळे असे सारे सहकारातील गट-तट, विखे-भाजपचे आ. शिवाजी कर्डिले यांच्या विरोधात एकत्र आले होते. असे चित्र जिल्ह्य़ात नेहमीच असते. राष्ट्रवादी-थोरात यांना बहुमत मिळाल्यानंतर अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे (पिचड समर्थक सीताराम गायकर) तर उपाध्यक्षपद काँग्रेसच्या थोरात समर्थकाकडे (रामदास वाघ) देण्यात आले. अध्यक्ष व उपाध्यक्षपद राष्ट्रवादी-थोरात गटाकडे प्रत्येकी अडीच वर्षांसाठी आलटून-पालटून राहील असे सुरुवातीला ठरले होते. मात्र विखे यांच्या भूमिकेमुळे थोरातांना पाच वर्षे हा बदल करता आला नाही. त्यामुळे बँकेचे अध्यक्षपद पिचड समर्थकाकडे पाच वर्षे कायम राहिले. थोरात समर्थकांची त्यावर वर्णी लागू शकली नाही.

राजकीय स्थिती बदलली

आता परिस्थिती बदलली आहे. राष्ट्रवादीचे वैभव पिचड यांनी विखे यांच्या पुढाकारातून भाजपमध्ये केला आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव शंकरराव गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश करून मंत्रिपद मिळवले आहे. राजकीय पक्षाच्या पटलावर बँकेमध्ये सध्या भाजपप्रणीत संचालकांचे प्राबल्य दिसते. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीची सत्ता असली तरी थोरात व राष्ट्रवादी शिवसेनेला बँकेत बरोबर घेतील असे नाही किंवा विखे भाजपमध्ये आहेत म्हणून ते भाजपमधील इतर कोणाला निवडणुकीत बरोबर घेतील अशी परिस्थिती नाही. भाजप व शिवसेना या दोघांना तसे सहकारात नगण्य स्थान आहे.

२०१५ च्या निवडणुकीमध्ये सुरुवातीला बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. परंतु आपल्या गटाला डावलले जाते आहे, हे लक्षात आल्यानंतर ऐनवेळी डॉ. सुजय विखे यांनी प्रक्रियेत प्रवेश करत, स्वतंत्र पॅनल तयार केले. खा. डॉ. विखे यांचा हा जिल्ह्य़ाच्या राजकारणातील प्रवेश ठरला होता.

सुरुवातीला बँकेमध्ये शेतकऱ्याचे हित जपले. आता ही बँक साखर कारखानदारांची झाली आहे. सेवा संस्था मतदारसंघातून हे कारखानदार बँकेत प्रवेश करतात. गेल्या निवडणुकीत निवडीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेणारे पांडुरंग अभंग व साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे या दोघांची नंतर तज्ज्ञ संचालक म्हणून बँकेवर नियुक्ती करण्यात आली.

जिल्ह्य़ातील १४ तालुक्यांतील सेवा संस्था, बिगरशेती संस्था, शेतीपूरक प्रक्रिया व पणन संस्था या तीन मतदारसंघांत संस्थांनी केलेले ठराव मतदानासाठी पात्र असतात. मोजक्याच मतदारांमुळे या मतदारसंघातील निवडणूक अटीतटीने लढवली जाते.

संचालकांच्या निवडून द्यायच्या २१ जागा आहेत. जिल्ह्य़ाच्या राजकारणात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार, आमदार नीलेश लंके, आमदार डॉ. किरण लहामटे यांनी नव्यानेच प्रवेश केला आहे. हे चौघेही राष्ट्रवादीचे आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत यंदा त्यांच्याही भूमिका महत्त्वाच्या ठरणार आहेत. हे चौघेही विखे विरोधक म्हणूनच ओळखले जातात.

साभार लोकसत्ता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER