राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचे कठपुतळी – अशोक विखे पाटील

Chairman

पुणे : काँग्रेस पक्षाचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बेकायदेशीरपणे प्रवरा ग्रामीण एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्षपद आपल्याकडे ठेवले आहे, असा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांचे मोठे बंधू अशोक विखे पाटील यांनी करून विखे-पाटील घराण्यातील वाद परत एकदा चव्हाट्यावर आणला आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला.

दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांनी सुमारे अडीच वर्षापूर्वी माझ्याकडे प्रवरा ग्रामीण एज्युकेश सोसायटीची जबाबादारी सोपविली होती. त्यानुसार धर्मदाय आयुक्त कार्यालयात याबाबतचा प्रस्तावही सादर करण्यात आला होता. मात्र,या प्रस्तावास आतापर्यंत मंजूरी प्रदान करण्यात आली नसतानाच, राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्तेचा गैरवापर करीत एका दिवसात प्रस्ताव सादर करून त्यास मंजूरी घेतली. त्यामुळे याबाबत मी त्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे’ असे अशोक यांनी सांगितले.

विवादित असलेल्या झकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनकडून प्रवरा मेडिकल महाविद्यालयाने दोन कोटी रुपयांचा निधी घेतला असल्याचा आरोपही अशोक यांनी यावेळी केला.मेडिकल कॉलेजचे उपाध्यक्षपद राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आहे. ईडीच्या एका अधिका-याकडून ही माहिती समजली असल्याचेही त्यांनी सांगितले.बाळासाहेब विखे पाटील यांनी स्थापन केलेल्या सर्व संस्था स्वता:च्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न राधाकृष्ण विखे पाटील व राजेंद्र विखे पाटील करत असल्याचा आरोपही अशोक विखे- पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

राधाकृष्ण विखे पाटील हे भारतीय जनता पक्षाचे कठपुतळी आहेत.शासनाविरोधात आरोप केल्यानंतर त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तरे द्यावीत.हे विखे-पाटील मुख्यमंत्र्यांना सांगतात,असा गंभीर आरोपही अशोक विखे पाटील यांनी केला आहे.