वयाच्या ९ व्या वर्षी विधवा झालेल्या राधाबाईंनी गांधी आंदोलनाला घराघरात पोहचवलं होतं!

Maharashtra Today

वीसाव्या शतकात भारतीय स्वातंत्र्यासाठी मोठी आंदोलनं झाली. ज्यांच्या प्रभाव देशाच्या इतिहासावर झाला. ब्रिटीशांना भारतातून हकलण्यासाठी स्त्री असो की पुरुष सर्वांनी क्रांतीलाच आपलं परमोच्च कर्तव्य मानलं. महात्मा गांधींच्या आंदोलनाला शेवटच्या माणसांपर्यंत पोहचवण्याचं श्रेय महिलांना दिलं जातं. कारण गांधींच्या ‘असहकार आंदोलनात’ (Gandhi movement)लाखो महिलांनी घराचा उंबरा ओलांडून इंग्रजांना कडव आव्हान दिलं होतं.

हा तो काळ होता जेव्हा महिलांच्या उद्धाराच्या चळवळी जोर धरत होत्या. स्वतः महिला महिलांच्या अधिकारांसाठी पुढं येत होत्या. या महिला स्वातंत्र सैनिकांच्या प्रयत्नांमुळं स्वदेशी आंदोलनापासून हरिजन उद्धारापर्यंतच्या गांधींच्या सर्व आंदोलनांना बळ मिळालं. प्रत्येक पावलावर त्यांनी चोख भूमिका निभावली. भारतातल्या अनेक गावातल्या नागरिकांना, अबाल वृद्धांना त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत आणलं.

अशाच एक थोर महिला स्वातंत्र्य सैनानि होत्या ‘डॉ. राधाबाई.’ (Radhabai) मजेशीर बाब ही की त्यांनी न कोणत्या वैद्यकीय शाखेच शिक्षण घेतलं होतं न कोणत्या विषयातली पी.एच. डी. त्याच्या जवळ होती तरी लोक त्यांना डॉ. राधाबाई म्हणत असत. त्यांचा जन्म नागपुरमध्ये १८७५ साली झाला. खुप कमी वयात त्याचं लग्न झालं. वयाच्या ९ व्या वर्षी त्या विधवा झाल्या. यानंतर त्यांच्या शेजारच्यांनी त्यांच पालनपोषण केलं. तिथेच त्या हिंदी बोलायला शिकल्या.

बदलत्या वेळेसोबत १९१८ साली राधाबाई ह्या छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये नोकरी करु लागल्या. त्या कामात अव्वल तर होत्याच परंतू लोकांप्रति त्या संवदेनशील आणि मदत करणाऱ्या होत्या. १९२० मध्ये गांधींनी रायपुरचा दौरा केला तेव्हा राधाबाईंचा संपर्क गांधींशी आला. गांधींच्या भेटीनंतर त्यांनी पुढचं संपुर्ण आयुष्य देशाला समर्पित करण्याचा निर्णय घेतला. पुढं त्यांनी अनेक स्वातंत्र आंदोलनात भाग घेतला. अनेकदा त्या तुरुंगात गेल्या. ‘सत्याग्रही’ महिलांचा त्यांनी एक समुह बनवला. सर्व महिला त्यांच्या घरी एकत्रित येत आणि सकाळपासू चरख्यावर काम करायच्या. प्रभात फेरी काढून लोकांमध्ये स्वातंत्र्याचा विचार रुजवायच्या.

रायपुरची मठ आणि मंदिरं महिला प्रशिक्षणाचे केंद्र बनले. एकाबाजूला महिलांना चरख्यावर सुत कसं काढायचं हे शिकवल जायचं तर दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्य चळवळीत महिला देऊ शकत असलेल्या योगदानाचं प्रशिक्षण दिलं जायचं. राधाबाई यांनी प्रभावी महिलांची फळी बनवली त्यात केतकी बाई, फुलकुंवर बाई, रुक्मिणीबाई, पार्वती बाई, रोहिणी बाई पगारिया आणि जमुना बाई यांचा सामावेश होता.

अस्पृश्यता निवारणात त्यांनी मोठं योगदान दिलं. घरोघरी जाऊन त्यांनी खादीचे कपडे विकले. दारूची दुकानं बंद व्हावीत यासाठी पुढाकर घेतला. धरण्यावर बसल्यावर डॉ. राधाबाई यांची भाषणं महिलांमध्ये उत्साहाचा संचार करायचे. १९३० साली काही सत्याग्रह्यांनी अमरावतीच्या तुरुंगातून काढून रायपूरमध्ये आणण्यात येत होतं. डॉ. राधाबाई स्टेशनवर पोहचल्या एका हातात तिरंगा आणि दुसऱ्या हातात भोजनाची थाळी घेऊन. इंग्रज कलेक्टरांनी लाठीचार्जचा आदेश दिला. डॉ. राधाबाईंनी अनेक काठ्या झेलल्या परंतू त्यामागे सरल्या नाहीत.

१९२० ते १९४२ या कालखंडात त्यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतला. या आंदोलनात डॉ. राधाबाईंनी पुढाकार घेतला. त्यांच्याकडून प्रेरणा घेत अनेक महिलांनी स्वातंत्रता आंदोलनात सहभाग घेतला. रायपुरात त्यांची इतकी लोकप्रियता वाढली की लोकांनी त्यांना ‘डॉक्टर’ ही पदवी बहाल केली. १९५० मध्ये या विरांगणेनं जगाचा निरोप घेतला. जाता जाता त्यांनी स्वतःच घर अनाथ आश्रमाला दान केलं. त्यांच्या त्यागामुळेच आपण स्वतंत्र भारतात श्वास घेऊ शकतोय.इतिहासाच्या पुस्तकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली असली तरी आपण त्यांच स्मरण करुन त्यांच्या त्यागातून प्रेरणा घ्यायला हवी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button