एलईडी प्रकल्पावरुन महापालिकेच्या सभेत राडा

कोल्हापूर :कोल्हापूर शहरात एनर्जी एफिशिसन्सी सर्व्हीसेस लिमिटेड (ई. ई. एस. एल.) कंपनीने बसविलेले एलईडी (पथदिवे) प्रकल्प बोगस आहे. अधिकाऱ्यांना हाताशी धरुन कोट्यावधीचा भ्रष्टचार या माध्यमातून केला असल्याचा गंभीर आरोप गुरूवारच्या महासभेत नगरसेवकांनी केला. शहरात ई. ई. एस. एल. कंपनीकडून एल. ई. डी. बसविण्याचे काम सुरू आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी विशेष सभा आयोजित केली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर माधवी गवंडी होत्या.

सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना विराधी भाजप-ताराराणी आघाडी आदी सर्वच पक्षातील नगरसेवक प्रचंड आक्रमक झाले होते. सभेत प्रचंड आरडाओरडा, व मोठा गदारोळ सभेत झाला. ठेकेदार कंपनी मुजोर असली तरी त्यांची घमेंड, मस्ती उतरवून काम करून घेऊ, असा इशाराही नगरसेवकांनी दिला. संबंधित कंपनीला अधिकारी एवढी पाठिशी घालत आहेत. कंपनीची बाजू घेऊन बोलत असल्याचा आरोप करत शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनाही नगरसेवकांनी प्रश्नांची सरबत्ती केली. अखेर २० जुलै रोजी होणार्या सभेत संबंधित कंपनीच्या प्रमुखांना उपस्थित ठेवण्याची ग्वाही आयुक्त कलशेट्टी यांनी दिली.

संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीला नगरसेवकांनी प्रश्नांची सरबत्ती करून भांबावून सोडले. संबंधित प्रतिनिधीच नगरसेवकांना साहित्य उपलब्ध नाही, असे म्हणून उध्दट उत्तरे देत होता, असे सभागृहात सांगण्यात आले. कनिष्ठ दर्जाचा प्रतिनिधी असल्याने त्याला एकाही प्रश्नाचे उत्तर देता येत नव्हते. नगरेसवकांनी खोटं बोलला तर सभागृहातून जाऊ देणार नाही, असा इशारा दिला. त्यानंतर काही मिनिटांतच संबंधित प्रतिनिधी महापालिकेतून पळून गेला. अनेक नगरसेवक त्याला बोलवा असे म्हणत होते. तरीही तो प्रतिनिधी आला नाही. एलईडीच्या राड्याने महापालिकेची सभा गाजली.