वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने फळबागांसह रब्बी पिकांनाही फटका

Rabi Crop

पुणे :- हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार काल विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार वार्‍यासह पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. धुळे, औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, वाशिम, कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागांत  काल संध्याकाळी जोरदार पाऊस झाल्याचं कळलं आहे. आज विदर्भात बर्‍याच ठिकाणी तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अशाच पावसाची शक्यता आहे. बुलडाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसात वादळी वाऱ्यासह प्रचंड गारपीट झाल्यानं शेतीतील पिकाचं नुकसान झालं, गहू हरभरा यासह फळबागांचंही नुकसान झाल्यानं ३०० हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

जालना जिल्ह्यातल्या बहुतांश भागात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्यानं काढणीस आलेल्या गहू, हरभरा, मका आदी पिकांसह द्राक्ष, डाळिंब बागांचं मोठं नुकसान झालं. आंब्याचा बहरही गळून पडला. गारपिटीमुळे मोसंबी, आंबा, डाळिंब, द्राक्ष बागांचं नुकसान झालं आहे. तर, गहू, हरभरा, मका अशा रब्बी पिकांनाही याचा मोठा फटका बसला आहे. दुसरीकडे ‘कोरोना’ची एन्ट्री झाल्याने कोकणचा राजा हापूस आंबा संकटात सापडला आहे. यंदा उशिरापर्यंत पाऊस राहिल्याने आंबा, काजू, नारळ, सुपारी, जांभूळ, करवंदे या उन्हाळी फळांचे उत्पन्न घटले आहे.

आंबा, काजूला नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत थंड हवामान लागते. तसे नसल्याने मोहोर उशिरा आला. सध्या आंबा, काजू, जांभूळ, कोकमची फळे तयार होत आहेत. कोरोनामुळे आंबा, काजूच्या मार्केटमध्ये मंदीचा काळ आला आहे. दरवर्षी हापूस आंबा मार्चच्या प्रारंभीच बाजारात दाखल होतो. मार्च महिन्यात आंब्याच्या पेटीचा दर १५०० ते २००० रुपये असतो. मेच्या प्रारंभी आंब्याचा दर २०० रुपये डझनवर येतो. हापूस परदेशात निर्यात होतो. मात्र, सध्या परदेशात निर्यातीवर बंदी आहे.


Web Title : Rabi crops washed pre monsoon rains major setback farmers

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)