रब्बीचे क्षेत्र ६० लाख हेक्टरपर्यंत वाढण्याची शक्यता – दादा भुसे

Dada Bhuse

मुंबई : यंदा चांगला पाऊस झाल्याने राज्यात रब्बीच्या शेतीचे क्षेत्र ६० लाख हेक्टरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी पुणे येथे झालेल्या बैठकीत दिली.

राज्याचे रब्बी पिकाखालील क्षेत्र सुमारे ५२ लाख हेक्टर आहे. या हंगामात ज्वारी, हरभरा, गहू, मका, कांदा व भाजीपाला ही प्रमुख पिके घेतली जातात. यंदा राज्यात समाधानकारक पाऊस होतो आहे. धरणे-बंधारे भरले आहेत. यामुळे राज्याच्या रब्बी हंगामाच्या क्षेत्रात वाढ अपेक्षित असून ते ६० लाख हेक्टरपेक्षा असण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामासाठी एकूण ९.१४ लाख क्विंटल बियाण्यांची गरज असणार आहे. ९.२५ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येते असे, असे कृषिमंत्री म्हणाले.

रब्बी हंगामामध्ये गेल्या वर्षी २७.६९ लाख मेट्रिक टन खतांचा वापर झाला होता. यंदा क्षेत्र वाढीचा अंदाज घेऊन ३४.६० लाख मेट्रिक टन खतांची मागणी केंद्र सरकारकडे नोंदविण्यात आली असून त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे भुसे यांनी सांगितले.

कोकण व पूर्व विदर्भात रब्बी हंगामाचे क्षेत्र कमी आहे. तिथेही दुबार पिकाखालील क्षेत्र वाढल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नांत भर पडेल. यासाठी कृषी विद्यापीठांनी संशोधन करण्याची गरज आहे, अशी सूचना कृषिमंत्र्यांनी कृषी विद्यापीठांना यावेळी दिली.

खरीप हंगामातील पिकांची सद्य:स्थिती, सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ पूर्ण करा, असे निर्देश त्यांनी दिले.

बैठकीत कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरजकुमार, व्यवस्थापकीय संचालक (महाबीज), कृषी विद्यापीठातील संशोधक व विस्तार संचालक, कृषी विभागाचे सर्व संचालक, सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER