आर. अश्विनने ‘ते’ केले जे 100 वर्षातही कुणाला जमलेले नाही

Ravichandran Ashwin

रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) हा गेल्या काही वर्षांपासून भारताचा आघाडीचा फिरकी गोलंदाज आहे. त्याच्या नावावर बरेच विक्रम असले तरी सोमवारी चेन्नईच्या (Chennai) चेपॉक स्टेडियमवर त्याने इंग्लंडविरुध्द (India Vs England) असा विक्रम केला जो त्याच्याशिवाय फक्त इतर दोघांनाच जमलाय आणि गेल्या 114 वर्षात कुणालाही जमलेले नाही. हा विक्रम म्हणजे कसोटी सामन्याच्या डावात पहिल्याच चेंडूवर गडी बाद करणारा तो केवळ तिसराच फिरकी गोलंदाज ठरलाय.

सहसा कोणत्याही प्रकारच्या सामन्यांमध्ये सुरुवातीलाच फिरकी गोलंदाजाच्या हाती चेंडू सोपवला जात नाही. अर्थात याला अपवाद आहेत आणि तसा अपवाद सोमवारी विराट कोहलीने केला. कारण इंग्लंडने भारताचा डाव संपवल्यावर फाॕलोआॕन न देता पुन्हा फलंदाजीचा निर्णय घेतला त्यावेळी उपाहाराआधीच्या फक्त दोनच षटकांचा खेळ बाकी होता. खेळपट्टीवर चेंडू वळताना दिसत होता म्हणून इंग्लंडची कोंडी करण्यासाठी विराटने सुरुवातीलाच चेंडू अश्विनच्या हाती सोपवला आणि त्याने पहिल्याच चेंडूवर रोरी बर्नस् ला (Rory Burns) रहाणेकडून झेलबाद करत हा दूर्मिळ विक्रम केला.

क्रिकेटच्या विक्रमांमधील नोंदीनुसार कसोटी डावाच्या पहिल्याच चेंडूवर गडी बाद करणारे फिरकीपटू असे…

  • बाॕबी पील (इंग्लंड) वि. अॕलेक बॕनरमॕन(आॕस्ट्रेलिया)- मँचेस्टर – 1888
  • बर्ट व्होल्गर ( द.आफ्रिका) वि. टॉम हेवर्ड, (इंग्लंड)- ओव्हल- 1907
  • रविचंद्रन अश्विन (भारत) वि. रोरी बर्नस् (इंग्लंड)-.चेन्नई- 2021

यापैकी बाॕबी पील यांनी 1888 च्या मालिकेतील तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात ही कामगिरी केली. त्यांनी अॕलेक बॕनरमनला पहिल्याच चेंडूवर डब्ल्यू.जी. ग्रेस यांच्याकडे झेल देण्यास भाग पाडले.

बर्ट व्होल्गर हे फिरकी गोलंदाजी करायचे तसे मध्यमगती गोलंदाजीसुध्दा करायचे. त्यामुळे त्यांनी टॉम हेवर्डची पायचीत विकेट फिरकीवरच घेतली होती का हा आता संशोधनाचा विषय आहे.

त्यानंतर आता अश्विनने इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील पहिलाच चेंडू आॕफच्या बाहेर टाकल्यावर आत वळला.त्यावर बचावात्मक खेळायला बर्नस पुढे आला पण चेंडू वळला आणि उंचसुध्दा आला आणि बॕटीची वरची कड घेऊन रहाणेच्या हातात विसावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER