आठ कोटी दिले पण ‘सारथी’च्या स्वायत्ततेचे काय? चंद्रकांत पाटील यांचा सवाल

कोल्हापूर : ‘सारथी’ संस्थेसाठी आठ कोटी रूपयांची तरतूद केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. आठ कोटी दिले ठिक आहे, पण ‘सारथी’च्या स्वायत्ततेचे काय?, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी उपस्थित केला आहे.

ही बातमी पण वाचा:- सारथी’ची जबाबदारी अजित पवारांनी घेतली, पहिल्याच बैठकीत ८ कोटी जाहीर

सारथी’ला आठ कोटींच्या निधीची तरतूद केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले, आठ कोटींतून ‘सारथी’च्या माध्यमातून दिली जाणारी आणि थकीत असलेली विद्यार्थ्यांची फेलोशिप, शिष्यवृत्ती आणि तारादूतांचे थकलेले वेतन देण्याचे प्रश्न मार्गी लागतील. मागील प्रश्न मार्गी लागले तरी पुढे इतर सर्व कामे सुरू करायची असतील तर लागणाऱया पैशाचे काय? हा खरा प्रश्न आहे. बार्टीला स्वायत्तता असेल तर ती ‘सारथी’ला असली पाहिजे. ‘सारथी’ नियोजन विभागाच्या अंतर्गंत आहे, तर मग प्रत्येक वेळेला एक फाईल नियोजन विभागात येणार का? अशी फाईल सहा महिने खाली वर खाली वर फिरणार का? असे प्रश्न आहेत. फडणवीस सरकारच्या काळात आम्ही ‘सारथी’ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली होती. पण या सरकारने नियोजन विभागातर्गंत ‘सारथी’चा समावेश केल्याने ‘बार्टी’ प्रमाणे स्वायत्तता नाही. नजीकच्या काळात मराठा समाजातील मुलांना एमपीएससी, युपीएससीसाठी प्रशिक्षणासाठी फी, पुस्तके, दिल्लीसारख्या ठिकाणी पाठविणे असेल, या गोष्टी करायच्या असतील तर त्यासाठी पैसा कसा देणार? हे सरकार सांगत नाही. सरकारला खरोखरच मराठा समाजातील युवक, युवतींविषयी प्रेम असेल तर त्यांनी पैसे द्यावेत. दोन वर्षांपूर्वी मराठय़ांना आरक्षण मिळण्याआधी फडणवीस सरकारने जे ओबीसींना ते मराठय़ांना अशी भूमिका घेऊन 605 अभ्यासक्रमांची निम्मी फी उच्च शिक्षण विभागाच्या मार्फत भरली. दोन वर्षांनी मराठा एससीबीसी झाला. आताही आता ती फी ओबीसी विभागाकडून द्यावी लागेल. त्यासाठी वर्षाला सरासरी 674 कोटी रूपये लागतात. या पैशाचे काय? असा सवालही चंद्रकांतदादा पाटील यांनी केला.

‘बार्टी’च्या धर्तीवर ‘सारथी’ही स्वायत्त संस्था असणे गरजेचे आहे. मात्र ठाकरे सरकारने सारथीला नियोजन विभागाच्या अंतर्गंत घेतले आहे. त्यामुळे ‘सारथी’च्या माध्यमातून मराठा समाजातील युवक, युवतींसाठी मिळणाऱया मदतीची फाईल मुंबईतील मंत्रालय आणि पुण्यातील सारथी केंद्रात फिरत राहण्याचा धोका आहे. ही बाब मराठा समाजातील युवक, युवतींच्या शैक्षणिक विकासासाठी गंभीर असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER