कासिम सुलेमानीची हत्या : ट्रम्प यांच्याविरुद्ध वॉरंट!

Qasem Soleimani - Donald Trump

वॉशिंग्टन : इराकमधील न्यायालयाने ट्रम्प (Donald Trump) यांच्याविरोधात अटक वॉरंट काढले आहे. इराणचे जनरल आणि एका प्रभावशाली इराकी मिलिशिया नेत्याला ठार मारल्याप्रकरणी अटक वॉरंट काढले आहे. याआधी इराणनेदेखील ट्रम्प यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केला आहे. इराणने ट्रम्प यांच्या अटकेसाठी इंटरपोलचीदेखील मदत मागितली आहे.

अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात जनरल कासिम सुलेमानी (Qasem Soleimani) आणि अबु माहदी अल मुहंदिस मारले गेले. या प्रकरणात बगदादच्या न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी वॉरंट जारी केल्याची माहिती इराकी न्यायालयाच्या माध्यम कार्यालयाने दिली. सुलेमानी आणि मुहंदिस गेल्या वर्षी बगदाद विमानतळाबाहेर ड्रोन हल्ल्यात मारले गेले. त्यानंतर अमेरिका आणि इराकमधील संबंध ताणले गेले.

इराणनं त्यांच्या सर्वांत वरिष्ठ जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येच्या एका वर्षानंतर आंतरराष्ट्रीय संस्था इंटरपोलकडे ट्रम्प यांच्या अटकेसाठी मदतीची मागणी केली आहे. ट्रम्प यांच्यासह अमेरिकच्या ४७ अधिकाऱ्यांविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याचे आवाहन इराणने इंटरपोलकडे केले आहे. इराणने याआधी जूनमध्ये इंटरपोलकडे रेड कॉर्नरची नोटीस जारी करण्याचे आवाहन केले होते. मात्र तेव्हा इंटरपोलनं त्यांची मागणी फेटाळली होती.

रेव्हॉल्युशनरी गार्डचे टॉप कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष आणि पेंटॉगॉनचे कमांडर यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी व्हायला हवी, अशी मागणी इराणचे न्याय विभागाचे प्रवक्ते गुलाम हुसेन इस्माइली यांनी केली. आम्ही यासाठी इंटरपोलला आवाहन केले आहे. आमच्या कमांडरच्या हत्येसाठी जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी आणि याबद्दल आम्ही अतिशय गंभीर आहोत, असे इस्माइली म्हणाले. इराणने या प्रकरणात आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एक हजार पानांचे आरोपपत्र तयार करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER