पी.व्ही. सिंधूचे केले भरभरुन कौतुक

PV sindhu's appreciation by saina nehwal

आपल्याला टक्कर देणाऱ्या, वेळेप्रसंगी भारी पडणाऱ्या प्रतिस्पर्ध्याचे कौतुक करण्याचा दिलदारपणा आपल्यात कमीच असतो, उलट त्या प्रतिस्पर्ध्यांचे उणे-दुणेच दाखवण्यात आपण धन्यता मानतो. मात्र खेळाडू याला अपवाद असतात. प्रतिस्पर्ध्याचे कौतुक करण्याची खेळाडूवृत्ती म्हणजेच आपल्या सर्वसामान्यांच्या भाषेत दिलदारपणा त्यांच्याकडे असतो.

याचे उत्तम उदाहरण म्हणजे फुलराणी सायना नेहवालने एका आघाडीच्या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत आपली दुसरी फुलराणी पी. व्ही. सिंधूचे केलेले भरभरून कौतुक!

सायना म्हणते की, सिंधूसोबतची तुलना मला अधिकाधिक मेहनत करण्यास प्रेरीत करते. आम्ही दोघी एकाच अकेडमीतून पुढे आलो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलो. मला आनंद आहे की ती अतिशय छान खेळतेय आणि मलासुध्दा अधिकाधिक यशासाठी प्रेरीत करतेय. एकाच खेळात दोन व्यक्ती सारख्याच ताकदीच्या, सारख्याच क्षमतांच्या म्हणजे तोडीस तोड खेळत असतील तरी स्पर्धा वाढते, वाढतच जाते. त्यामुळे मी आमच्यात होणाऱ्या तुलनेचा स्वतःला फारसा त्रास करुन घेत नाही. मला माझ्या स्वतःच्याच तयारीकडे लक्ष द्यायला वेळ कमी पडतो, त्यामुळे इतरांच्या कामगिरीची माहिती ठेवण्यात मी फारसा वेळ घालवत नाही. ती तिच्या प्रतिस्पर्ध्याचा व्यवस्थित विचार करत असेल आणि मलासुध्दा प्रतिस्पर्ध्यांना अधिक प्रभावीपणे सामोरे कसे जायचे याचा विचार करायचा असतो असे सायना म्हणाली.

आपल्याला आव्हानास्पद ठरणाऱ्या प्रतिस्पर्धी कोणत्या, या प्रश्नाच्या उत्तरात सायनाने ताई त्झू यींग, कैरोलिना मारीन आणि अकाने यामागुची यांची नावे घेतली. या तिघींना वरचढ कसे ठरता येईल यासाठी मला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे असे सायना म्हणते.

सायनाप्रमाणेच सिंधूलासुध्दा ताई त्झू यींग त्रासदायक ठरत आली आहे. त्याबद्दल सायना सांगते की ताईचा खेळ अधिक वैविध्यपूर्ण असल्याने तिचा खेळ पटकन लक्षात येणे अवघड असते. तिच्याकडे प्रत्येक स्थितीसाठी प्रभावी फटका आहे आणि म्हणून तिच्याशी खेळताना आम्हाला जास्त दक्ष आणि जास्त ‘फिट’ रहावे लागते. अलीकडे कैरोलिनासुध्दा तेच करतेय. त्यामुळे तीसुध्दा अवघड ठरतेय. ताईला कोंडीत पकडणे अवघडच असते. ती भरात असली तर कुणालाही सहज 10 पेक्षा कमीच्या स्कोअरवर हरवू शकते. तिच्यासाठी कोणतेही ठरवलेले डावपेच चालू शकत नाही, असे सायनाने ताईचे वर्णन केले.

सायना म्हणते की आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्येक खेळाडूसाठी एक-दोन प्रतिस्पर्धी डोकेदुखी ठरत असतात. एकीकडे मला ताई किंवा कैरोलिना आव्हानास्पद वाटतात त्याचवेळी मी रत्चानोक इंतानोनला हरवू शकते असा मला विश्वास आहे आणि रत्चानोक ताईला मात देवू शकते. मात्र हल्ली आंतरराष्ट्रीय बैडमिंटनचे वेळापत्रक एवढे व्यस्त आहे की, तुम्हाला प्रतिस्पर्ध्याच्या खेळाचा अभ्यास करण्यासाठी वेळच नसतो याकडे तिने लक्ष वेधले.

16 डिसेंबरला होणार विवाहबध्द

आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांच्या व्यस्त कार्यक्रमाबद्दल बोलतानाच सायनाने केवळ डिसेंबरच्या मध्यातच आपल्याला वेळ आहे आणि त्याच काळात आपण दीर्घकाळचा मित्र पुरुपल्ली कश्यप याच्यासोबत विवाहबध्द होऊ असे सुतोवाच तिने केले आहे. त्यांच्या लग्नाची गाठ बहुधा 16 डिसेंबरला बांधली जाणार असे खात्रीलायक वृत्त आहे कारण त्यानंतर 20 डिसेंबरपासून प्रिमियर बैडमिंटन लिग आणि त्यानंतर टोकियो अॉलिम्पिकची पात्रता स्पर्धा होणार आहे. त्यात हे दोघी प्रेमी बिझी राहणार असल्याने 16 डिसेंबर हाच दोनाचे चार होण्यास योग्य दिवस असल्याचे त्यांना वाटत आहे. त्यामुळे सायना-कश्यपच्या विवाहाचा बार 16 डिसेंबरला उडणार हे जवळपास निश्चित आहे.