भारताच्या पी.व्ही.सिंधूची संघर्षपूर्ण विजयासह उपांत्यपूर्व फेरीत धडक

P.V Sindhu

जकार्ता :- इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत संघर्षमय लढतीत भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने डेन्मार्कच्या मिया बिलिचफेल्टविरुद्ध तीन गेमपर्यंत रंगलेल्या लढतीत सरशी साधत गुरुवारी इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पाचव्या मानांकित सिंधूने दुसऱ्या फेरीच्या लढतीत एक तास दोन मिनिटामध्ये बिलिचफेल्टविरुद्ध २१-१४, १७-२१, २१-११ ने सरशी साधली.

सिंधूचा जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानावर असलेल्या बिलिचफेल्टविरुद्ध यंदाचा तिसरा विजय आहे. यापूर्वी तिने डेन्मार्कच्या या खेळाडूचा इंडियन ओपन व सिंगापूर ओपनमध्ये पराभव केला होता. सिंधूची यानंतरची लढत मलेशियाच्या सोनिया चेह व जपानच्या नाओमी ओकुहारा यांच्यादरम्यानच्या लढतीत विजेत्या खेळाडूसोबत होईल.

सिंधूची सुरुवात चांगली झाली नाही आणि बिलिचफेल्टने ६-३ अशी आघाडी घेतली. त्यानंतर भारतीय खेळाडूने पुनरागमन करताना बरोबरी साधली. सिंधूने कामगिरीत सातत्य राखत पहिला गेम जिंकला.

दुसऱ्या गेममध्ये संघर्षपूर्ण खेळ अनुभवायला मिळाला. बिलिचफेल्टने दमदार पुनरागमन केले. तिने सुरुवातीला ९-५ आणि त्यानंतर १०-७ ने आघाडी घेतली. सिंधूने त्यानंतर सलग ३ गुण वसूल करीत १०-१० अशी बरोबरी साधली.

डेन्मार्कच्या खेळाडूने सिंधूच्या चुकांचा लाभ घेतला आणि दुसरा गेम जिंकत बरोबरी साधली. निर्णायक गेममध्ये मात्र सिंधूने वर्चस्व गाजवले व सहज सरशी साधत विजयावर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान, सात्विकासाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरुष दुहेरीच्या जोडीला दुसऱ्या फेरीत इंडोनेशियाच्या अव्वल मानांकित मार्कस फर्नाल्डी गिडियोन व केव्हिन संजय सुकामुल्जो यांच्याविरुद्ध १५-२१, १४-२१ ने पराभव स्वीकारावा लागला.

उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सिंधूची कामगिरी कशी राहील यावर भारताचे पदक अवलंबून आहे. सिंधूचे लक्ष अंतिम फेरीत विजय मिळविण्याचे आहे.